मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील लोकायुक्तांच्या पथकाने एका महसूल अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडल्यानंतर त्याने लाच घेतलेली रक्कम तोंडात कोंबल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या अधिकाऱ्याच्या तोंडातून नोटा काढण्याचा खूप प्रयत्न केला तरीही त्याने त्या तोंडातून बाहेर काढल्या नाहीत. त्यामुळे त्यांला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
लाच घेतलेल्या नोटा टाकल्या तोंडात –
जबलपूर लोकायुक्त टीमला बिलहरी हल्का गावात कार्यरत असलेला महसूल अधिकारी गजेंद्र सिंह याने चंदन लोधी यांच्याकडे ५ हजारांची लाच मागितल्याची तक्रार मिळाली होती. तक्रारीनंतर लोकायुक्तांच्या पथकाने लाच मागणाऱ्या अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडण्याची योजना आखली. पण अधिकाऱ्याने लोकायुक्तांच्या पथकाला पाहताच लाचेची रक्कम चक्क तोंडात टाकून चघळायला सुरुवात केली.
खूप प्रयत्न करूनही तोंडातून नोटा बाहेर काढल्या नाहीत –
घटनेतील अधिकाऱ्याने लाचेच्या सुमारे ९ नोटा तोंडात ठेवून चघळल्याचं सांगण्यात येत आहे. शिवाय खूप प्रयत्न करूनही त्याने तोंडातून नोटा बाहेर काढल्या नाहीत. यानंतर लोकायुक्तांचे पथक त्याला रुग्णालयात घेऊन गेले. हॉस्पिटलमध्येही पटवारी तोंडातून पैसे काढायला तयार नव्हता. मात्र खूप प्रयत्न केल्यानंतर त्याच्या तोंडातील नोटा बाहेर काढण्यात यश आलं. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अधिकारी नोटा चघळताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, या अधिकाऱ्याला लोकायुक्तांच्या पथकाने अटक केली असून त्याच्या विरिधात पुरेसे पुरावे असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –
हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या ट्विटर युजरने, या अधिकाऱ्याने नोटा काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या पथकातील एका सदस्याचे बोट चावल्याचा दावा केला आहे. एका ट्विटर युजरने व्हिडिओ पाहिल्यानंतर लिहिलम आहे, “मध्य प्रदेशमध्ये हे सर्व नवीन नाही, येथे लाच दिल्याशिवाय कोणतेही काम होत नाही.” त्यावर दुसर्याने लिहिले, “बरोबर आहे भाऊ, मध्य प्रदेशात शून्य सहनशीलतेचा खेळ सुरू आहे,.” तर आणखी एका नेटकऱ्याने म्हटलं आहे की, मध्य प्रदेशातील अधिकाऱ्याने स्वतःला वाचवण्यासाठी नोट कशी चघळली, हे राम हे असे कसे करु शकतात.