Mumbra Heavy Rain Shocking Video : मुंबईसह आजूबाजूच्या शहरांना सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसानं झोडपलं आहे. अनेक भागांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू आहे. रस्ते जलमय झालेत, अनेकांच्या घरांत पाणी शिरलंय, रेल्वे वाहतुकीवर याचा परिणाम झालाय. मुसळधार पावसानं अनेक शहरातील रस्त्यांवर पाणी नदीसारखं दुथडी वाहू लागलं आहे. दरम्यान, ठाण्यातील मुंब्रा परिसरातही पावसानं अक्षरश: हाहाकार माजवला आहे. मुंब्र्यातील याच पावसातील एक भयानक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही धडकी भरल्याशिवाय राहणार नाही.

मुंब्र्यातील अनेक सोसायट्यांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय. त्यामुळे नागरिकांना चालणं दूर, त्या पाण्यातून वाहनं काढतानाही अडचणी येत आहेत. दरम्यान, रस्त्यावर इतक्या वेगानं पाणी वाहतंय की, लोक अक्षरश: दोरीच्या साह्यानं रस्ता ओलांडताना दिसतायत. त्याच पाण्याच्या वेगात अनेक वाहनं वाहून जाताना दिसतायत, ज्यांना रोखण्यासाठी लोकांची पळापळ सुरू आहे.

व्हिडीओ तुम्ही पाहू शकता, पावसाचा जोर इतका आहे की, नदीच्या पाण्यानं रस्त्यावरून वाहताना अक्षरश: रौद्र स्वरूप धारण केलंय. पाण्याचा प्रवाह इतका वेगानं आहे की, पार्क केलेल्या अनेक दुचाकी त्यातून वाहून जाताना दिसतायत. व्हिडीओतही पाण्याच्या प्रवाहाबरोबर सोसायट्या आणि रस्त्यावर पार्क केलेल्या जवळपास पाच ते सात दुचाकी एकाच वेळी वाहून जाताना दिसतायत. त्यावेळी रस्त्याच्या कडेला उभे असलेले लोक या दुचाकींना रोखण्याचा प्रयत्न करतायत; पण पाण्याचा वेगच इतका आहे की, कोणीही पाण्यात उतरून त्या दुचाकी रोखू शकत नाहीत. तरीही एक व्यक्ती हिंमत करून त्या पाण्यात उतरून मदत करतेय. अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलंय.

पाण्याचा प्रवाह जास्त असल्यानं लोक दोरीच्या साह्यानं रस्ता ओलांडत आहेत. वाहून जाणाऱ्या वाहनांना रोखण्यासाठी लोकांची पळापळ सुरू आहे. पण, हा पाऊस असाच सुरू राहिला, तर येथील परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती व्यक्त केली जातेय.

@maherakhan8384 नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे, जो पाहून अनेकांनी नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.