Mumbai Powai Children Hostage News : मुंबईतील पवई भागात रोहित आर्य नावाच्या एका इसमाने १७ अल्पवयीन मुलांना डांबून ठेवल्याने खळबळ उडाली होती. चांदिवली येथील रॉ स्टुडिओ नावाच्या एका बंदिस्त इमारतीत त्याने १५ वर्षांखालील १७ मुलांना डांबून ठेवलं होतं. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पवई पोलीस, साकीनाका पोलीस व अग्निशमन दलाने या मुलांची सुटका केली आहे. अभिनय कार्यशाळेच्या नावाखाली बोलावलेल्या मुलांना आरोपीने ओलीस ठेवलं होतं. दरम्यान, त्याने मुलांना ओलीस ठेवल्यानंतर एक व्हिडीओ जारी करत त्याच्या मागण्या मांडल्या होत्या. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
आरोपी म्हणाला, “आत्महत्या करण्याऐवजी मी एक योजना आखली. मी काही मुलांचं अपहरण करून त्यांना ओलीस ठेवलं आहे. माझ्या काही साध्या मागण्या आहे. माझे काही प्रश्न आहेत, त्यांची उत्तरं हवी आहेत. मला काही लोकांशी बोलायचं आहे. त्यांना प्रश्न विचारायचे आहेत. त्यावर जी उत्तरं मिळतील त्यावर प्रतिप्रश्न विचारायचे आहेत. त्याशिवाय मला काहीच नको. मी कोणी दहशतवादी नाही. माझी पैशांची मागणी देखील नाही.”
मला केवळ चर्चा करायची आहे : रोहित आर्य
रोहित आर्य म्हणाला, “मला केवळ चर्चा करायची आहे. त्यासाठीच मी या मुलांना ओलीस ठेवलं आहे. मी एक योजना आखली आहे. त्यानुसार मी हे खरंच करणार आहे. मी नाही केलं तर दुसरा कोणीतरी करेल. मी मेलो तर दुसरा कोणीतरी नक्कीच असेल. परंतु, जे व्हायचं आहे ते जरूर होणार. याच मुलांबरोबर होणार. जर या मुलांना काही इजा झाली नाही तर…”
“माझ्याबरोबर इतर काहीजण आहेत”
“तुमच्याकडून एक छोटी चूक झाली तर मी या संपूर्ण जागेला आग लावेन. मी स्वतः मरेन. परंतु, या मुलांना इजा होईल, त्यांच्या मनावर गंभीर परिणाम होईल. असं काहीही झाल्यास मला जबाबदार धरू नका. त्यामुळे माझं सर्वांना सांगणं आहे की मला चिथावू नका. मी एक सामान्य माणूस आहे. मला थेट बोलायचं आहे. मी आता बाहेर येईन. माझ्याबरोबर इतरही अनेकजण आहेत. मी स्वतःच तुम्हाला उपाय सांगणार आहे. परंतु, मला चिथावू नका. मी कोणालाही इजा पोहोचवणार नाही.”
रोहितच्या या बोलण्यावरून त्याला नेमकं कोणाशी बोलायचं आहे, त्याची मागणी काय आहे हे समजू शकलं नाही. यावरून तो खरंच मनोरुग्ण असावा असा अंदाज बाधला जात आहे.
