प्रवासादरम्यान किंवा फिरायला गेल्यावर एखादी वस्तू हरवली, तर ती परत मिळण्याची अपेक्षा फारच कमी असते. पण, एका तरुणीला तिची हरवलेली एक मौल्यवान वस्तू अगदीच खास पद्धतीने परत मिळते. सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. मुंबईची एक तरुणी पाँडिचेरी येथे फिरायला जाते. यादरम्यान तिची ॲपल पेन्सिल हरवते; पण नंतर तिला खास पद्धतीने तिची ॲपल पेन्सिल परत मिळते.
एक तरुणी ऑरोविल (Auroville) या ठिकाणी फिरायला गेली होती. ऑरोविल हे ठिकाण भारतातील पाँडिचेरी येथे आहे. येथे समुद्रकिनारी तिच्या मैत्रिणीसोबत ती सुटीचा आनंद घेत होती. ऑरोविल येथील हॉटेलमध्ये थांबलेल्या एका अज्ञात व्यक्तीबरोबर त्यांची मैत्री झाली होती. तसेच या दोन्ही मैत्रिणींसोबत हा तरुणदेखील समुद्रकिनारी आनंद लुटत होता. यादरम्यान त्यातील एका तरुणीची ॲपल पेन्सिल (Apple Pencil) तिथे हरवते. तेव्हा तिचा हॉटेलवरील मित्र आणि तिची मैत्रीण सोबतच होते. पण, त्यांनी तिला निराश न होता सुटीचा आनंद घेण्यास सांगितला. त्यानंतर ती जेव्हा मुंबईला आली तेव्हा तिच्या घरी एक पार्सल आले. काय होते त्या पार्सलमध्ये एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…
पोस्ट नक्की बघा :
ॲपल पेन्सिलबरोबर दिली खास चिठ्ठी :
ऑरोविल येथील हॉटेलमध्ये ज्या तरुणासोबत तरुणीची मैत्री झाली होती, त्याचे नाव रक्षित होते. रक्षितने त्या तरुणीसाठी खास पार्सल पाठवले होते आणि त्यात तरुणीची हरवलेली ॲपल पेन्सिल होती. रक्षितने तरुणीला तिची ॲपल पेन्सिल तर दिलीच; पण त्याचबरोबर तिला एका कागदावर संदेश लिहून दिला. त्यात असे लिहिले होते, “या जगात प्रामाणिकपणा फारच कमी आहे; पण मी माझं कर्तव्य पूर्ण केलं. कारण- शेवटी फक्त प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे”, असे या कागदावर लिहिण्यात आले आहे. तसेच हे सर्व एका ओळीत न लिहिता एक-एक शब्द एकाखाली एक असा लिहिण्यात आला आहे. या चिठ्ठीबरोबर अप्सरा पेन्सिलचा बॉक्स व त्या बॉक्समधून ॲपल पेन्सिल आणि काही खास रंगाचे खडकसुद्धा पाठवून दिले आहेत.
सोशल मीडियावर ही पोस्ट @AkanshaDugad या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. या तरुणीचे नाव आकांक्षा असे आहे. तसेच ती मुंबईची असून, एक इंटेरियर डिझायनर आहे. एका अनोळख्या शहरात तिची मौल्यवान वस्तू हरवते आणि तेथील मित्र तिला ती मौल्यवान वस्तू शोधून, अगदी खास पद्धतीने तिला पाठवतो हे पाहून ती तरुणी ही गोष्ट सोशल मीडियावर शेअर करण्याचे ठरवते.