नवी मुंबईमधील नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरुन राजकीय वाद रंगलेला असतानाच आता या विमानतळाला रायगडमधील लोकप्रिय नेते दि. बा. पाटील याचं नाव देण्याची मागणी भाजपाने केलीय. तर सत्ताधारी महाविकास आघाडीने विमातळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्याची तयारी सुरु केली आहे. या विमानतळाला दि. बा. पाटलांचे नाव देण्याच्या मागणीसाठी स्थानिकांच्या कृती समितीने २४ जून रोजी सिडको कार्यालयासमोर आंदोलन केलं. या राजकीय वादामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी हे विमानतळ जुन्या विमानतळाचे एक्सटेन्शन असल्याने त्याला छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ हेच नाव राहणार असल्याचं म्हटलं आहे. या विमानतळाच्या नावावरुन वाद सुरु असतानाच आता सोशल नेटवर्किंगवर सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे २०१८ मध्ये मुख्यमंत्री असतानाच काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी पाठवलेल्या पत्राला फडणवीसांनी दिलेल्या उत्तराचं एक पत्र व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की वाचा >> जाणून घ्या : दि. बा. पाटील कोण होते? नवी मुंबई विमानतळाला त्यांचं नाव देण्याची मागणी का केली जातेय?

मंत्रालयामधून ७ जुलै २०१८ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने असणाऱ्या सही शिक्क्यासहीत हे पत्र पाठवण्यात आलं आहे. आगरी कोळी भूमिपूत्र महासंघ (नियोजित) नवी मुंबई यांचे निवेदनाच्या अनुषंगाने लिहिलेलं, नवीन मुंबई येथील नियोजीत आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील, असं नामकरण करण्यासंदर्भातील आपले पत्र दिनांक १९ जून २०१८ रोजी मिळाले. सदर पत्र प्रधान सचिव (विमानचाल) यांच्याकडे उचित कार्यवाहीसाठी करण्याच्या सुचनेसहीत पाठवण्यात आलं आहे, असं या पत्रामध्ये म्हटलं आहे. हे पत्र महाराष्ट्र काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाण यांना पाठवण्यात आलं होतं.

नक्की वाचा >> भाजपाची आंदोलनाला फूस ते शिवसेनेला थेट आव्हान… नवी मुंबई विमानतळ वादावर राज ठाकरेंनी मांडलेले १० मुद्दे

नक्की वाचा >> नवी मुंबई विमानतळ नामकरण: राज ठाकरेंच्या मताशी लोक सहमत, पाहा #LoksattaPoll चा निकाल

नक्की वाचा >> नवी मुंबई विमानतळ नामांतर वाद : राज ठाकरे म्हणतात, “स्वत: बाळासाहेब असते तर त्यांनी…”

या मजकुरासहीत व्हायरल झालं हे पत्र

याच पत्राचा संदर्भ देत सध्या या विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी करणाऱ्या भाजपावर निशाणा साधला जात आहे. ‘१९ जून २०१८ रोजी तत्कालीन काँग्रेस प्रदेशअध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केली होती पण तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलेल्या पत्रात की त्यांनी प्रधान सचीवांकडे उचित कार्यवाहीसाठी पाठवण्यात आल्याचे स्पष्ट केले होते. मग फडणवीस यांनी तेव्हाच निर्णय का घेतला नाही? केंद्रात व राज्यात भाजपा सरकार असताना तसा प्रस्ताव तयार करून केंद्राकडे का पाठवला नाही? तेव्हा निर्णय घेतला असता तर आज आंदोलनाची गरज होती का?,’ अशा मजकुरासहीत हे पत्र सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालंय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai airport naming issue ex cm devendra fadnavis letter goes viral scsg
First published on: 28-06-2021 at 15:24 IST