भारताचा खेळाडू ‘नीरज चोप्रा’ याने इतिहास रचला आहे. जागतिक भालाफेक स्पर्धेत (World Athletics Championships) भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्णपदकावर त्याचे नाव कोरले आहे. भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. एकूणच या स्पर्धेत नीरज चोप्राने ८८.१७ मीटर अंतरापर्यंत भालाफेक केली आणि अंतिम फेरीत त्याचा थ्रो सर्वोत्तम ठरला. नीरजने जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये दणदणीत कामगिरी करीत सुवर्णपदक पटकावले हा भारत देशासाठी एक अभिमानाचा क्षण आहे. आता सगळ्या माध्यमांतून नीरजचे कौतुक केले जात आहे. या सगळ्यातच प्रसिद्ध वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनीसुद्धा खास ट्विट शेअर केले आहे.
प्रसिद्ध वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांना त्यांच्या कलेसाठी २०१४ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सुदर्शन पटनायक अनेकदा वाळूत विविध कला सादर करून अनेकांचे लक्ष वेधून घेतात. आता त्यांनी नीरज चोप्रासाठी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या वाळूतील कलेद्वारे नीरज चोप्राला शुभेच्छा दिल्या आहेत. समुद्राच्या कडेला वाळूत त्यांनी सुवर्णपदक रेखाटून, त्या पदकाच्या अगदी मधोमध तिरंगा व भाल्याचे चित्र काढले आहे. त्यांनी नीरज चोप्राला शुभेच्छा देऊन ‘भारत देशाचा तू अभिमान आहेस’, असा संदेशही लिहिला आहे. सुदर्शन पटनायक यांची ही पोस्ट एकदा तुम्ही बघाच …
पोस्ट नक्की बघा :-
सोशल मीडियावरील ही पोस्ट सुदर्शन पटनायक यांच्या @sudarshansand या ट्विटर अकाउंटवरून शेअर केली गेली आहे. पटनायक यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “८८.१७ मीटरपर्यंत भालाफेक करून, सुवर्णपदक जिकणाऱ्या चॅम्पियन नीरज चोप्राचे अभिनंदन!आम्हाला तुझा पुन्हा एकदा अभिमान वाटतो आहे. जय हो!” नीरज चोप्राने जागतिक स्तरावर क्रीडा क्षेत्रात भारताचा ध्वज त्याच्या कामगिरीने रोवला आहे, असे म्हणायला हरकत नाही. सुवर्णपदक जिंकून भारताचे नाव उंचावणाऱ्या नीरज चोप्राला आपणसुद्धा खास शुभेच्छा देऊ या.
