पिंपरी-चिंचवडमध्ये भरवण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीची मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रभरामध्ये चर्चा होती. या शर्यतीची चर्चा असण्याचं कारण म्हणजे दीड कोटींच्या बक्षिसांमुळे चर्चेत होती. जेसीबी, बोलेरो, ट्रॅक्टर, बुलेट, ११६ दुचाकी अशी बक्षिसं या स्पर्धेसाठी ठेवण्यात आली होती. यापैकी, रामनाथ वारिंगे यांच्या बैलजोडीने अवघ्या ११:२२ सेकंदात घाट सर करत जेसीबीचं बम्पर प्राइज जिंकलं आहे. या गाड्याबरोबरच इतर चार बैलजोड्यांनी कमी वेळात ही घाट सर केला. त्यानंतर जेसीबी पाच जणांमध्ये विभागून देण्यात आला आहे. महाराष्ट्रभर चर्चेत असणाऱ्या या बैलगाडा शर्यतीला राजकारणीही उपस्थित राहिले होते. चिखली येथील या शर्यतींसाठी काल राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासहीत भाजपाचे आमदार नितेश राणेही उपस्थित राहिलेले. या बैलगाडा शर्यती पाहून नितेश राणे इतके भारावून गेले की त्यांनी यावेळी एक खास घोषणा केली.

नितेश राणेंनी ट्विटरवरुन या स्पर्धेला उपस्थित राहिल्याचा एक व्हिडीओ शेअर केलाय. यामध्ये नितेश राणे हे स्टेजवर असून समोर बैलगाडा शर्यती सुरु असल्याचं चित्र दिसत आहे. नितेश राणे यांनी या पोस्टमध्ये भोसरी मतदारसंघाचे आमदार आणि पिंपरी-चिंचवडचे भाजपा शहराध्यक्ष महेश लंगडे यांना टॅग करत देवेंद्र फडणवीसांचा संदर्भ देत एक घोषणा केली.

“ज्या वर्षी देवेंद्रजी (देवेंद्र फडणवीस) महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होतील त्यावर्षी आमदार महेशदादा यांच्यामार्फत भरवण्यात येणाऱ्या बैलगाडा शर्यतीच्या घाटाच्या राजाला (फायनल सम्राटला) माझ्याकडून मर्सिडिज गाडी बक्षीस म्हणून देण्यात येईल,” अशा कॅप्शनसहीत नितेश राणेंनी ट्विटरवरुन घोषणा केलीय. म्हणजेच यंदाच्या वर्षी ज्या स्पर्धेसाठी दीड कोटींची बक्षिसं ठेवण्यात आलेली, अशीच स्पर्धा फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर जेव्हा केव्हा पहिल्यांदा भरवण्यात येईल तेव्हा कमीत कमी वेळात घाट सर करणाऱ्या बैलजोडीच्या मालकाला नितेश राणेंकडून मर्सिडिज-बेन्झ गाडी बक्षिस म्हणून दिली जाणार आहे. मर्सिडिज-बेन्झ गाडीची किंमत भारतामध्ये ४१ लाख ९९ हजारांपासून सुरु होते.

नक्की वाचा >> बैलगाडा शर्यतीस हजेरी लावत देवेंद्र फडणवीसांनी ऐकवला ‘मुळशी पॅटर्न’चा डायलॉग, म्हणाले…

फेसबुकवरही नितेश राणेंनी ही घोषणा सर्व गाडामालकांसमोर केल्याचा व्हिडीओ पोस्ट केलाय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत म्हणून पिंपरी-चिंचवड शहरातील शर्यतीकडे पाहिलं जातं होतं. दीड कोटींची बक्षिसे असल्याने अवघ्या महाराष्ट्रात या शर्यतीची चर्चा होती. आमदार महेश लांडगे यांनी भरवलेल्या या शर्यतीत राज्याच्या कानाकोपऱ्यातून गाडामालकांनी सहभाग नोंदवला होता. तर तब्बल दोन हजार टोकन वाटप करण्यात आले होते. यापैकी १ हजार २०० बैलगाडा शर्यतीत धावले. पाच दिवस चाललेल्या या स्पर्धेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नितेश राणे, सदाभाऊ खोत, प्रकाश जावडेकर, प्रवीण तरडे यांनी हजेरी लावत बैलगाडा मालक, शौकिनांची मने जिंकली.