लहान मूल ज्या वातावरणात वाढवत, त्या वातावरणात ते घडत जाते. ते जर आनंदी वातावरणात वाढू लागले तर त्याचा स्वभावही तितकाच गोड होतो. पण, जर घरात सतत भांडण आणि द्वेषाचे वातावरण असेल तर लहान मूल कायम निराश, भीतीच्या मानसिकतेत जगते, ते ओरडणे आणि द्वेष हा स्वभाव म्हणून स्वीकारते. पण, या सगळ्यात लहान मुलांचा काही दोष नसतो. दोष असतो तो पालकांचा. कारण त्यांच्या बिझी लाईफ आणि वाईट गोष्टींमुळे लहान मुलांना नाईलाजाने वाईट वातावरणात जगणे भाग पडते. मात्र, अशा वातावरणाचा मुलांच्या मनावर किती खोलवर परिणाम होतो हे प्रत्यक्षात दाखवणारा एक ह्रदयस्पर्शी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्याही डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही.
“मला काय आवडते माहीत नाही”
नुकतेच दक्षिण कोरियातील ‘माय गोल्डन किड्स’ या टीव्ही शोमध्ये एका चार वर्षीय निरागस मुलाने हजेरी लावली होती, यावेळी त्याने पालकांसंदर्भात जे काही सांगितले ते ऐकून कुणाच्याही डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. लहान मुलं आयुष्यात कोणत्या आव्हानांना तोंड देतात, तसेच यावेळी पालकांची भूमिका काय असावी, याविषयी मार्गदर्शन आणि सल्ला देण्यासाठी हा शो डिझाइन करण्यात आला आहे. शोच्या एका एपिसोडसाठी ज्यूम जी युन या चिमुकल्याने हजेरी लावली होती. यावेळी इंटरव्ह्यूदरम्यान त्याला विचारण्यात आले की, तुला काय आवडते? ज्यावर त्याने उत्तर दिले की, मला माहीत नाही, मी घरी एकटाच असतो, माझ्यासोबत कोणी खेळत नाही. यावेळी एका बंद खोलीत अनेक खेळण्यांबरोबर एकटा खेळत असलेला ज्यूमचा व्हिडीओ दाखवण्यात आला.
“पप्पा रागवल्यावर मी खूप घाबरतो”
यानंतर ज्यूमला विचारण्यात आले की, आणि तुझे वडील? ज्यावर त्याने उत्तर दिले की, ते रागावतात… त्यांचा राग पाहून मी खूप घाबरतो. पुढे त्याला विचारण्यात आले की, तुला काय वाटतं, तुझे वडील कसे असावेत? यावर तो म्हणतो की, त्यांनी मला छान आवाजात जियूम्म्म्म… अशी प्रेमाने हाक मारावी अशी माझी इच्छा आहे.
यापुढे ज्यूमला विचारण्यात आले की, आणि तुझी आई? यावर ज्यूम म्हणाला, मला वाटतं, तिला मी आवडत नाही, ती माझा तिरस्कार करते; असे म्हणत ज्यूमला अश्रू अनावर झाले, तरीही तो मोठ्या माणसांप्रमाणे अश्रू आवरण्याचा प्रयत्न करून म्हणतो, एक मिनिट थांबा. लहान वयात त्याच्यातील परिपक्वता पाहून लोकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. यावर त्याला पुढे विचारण्यात आले की, तू हे सर्व तुझ्या आईला सांगितलसं का? ज्यावर तो तोंड वाईट करत म्हणतो की, ती माझे कधी ऐकत नाही, त्यांनी माझ्यासोबत खेळावे अशी माझी इच्छा आहे.
जेव्हा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, तेव्हा लोकांनी ज्यूमच्या पालकांना त्यांच्या निष्पाप मुलाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल फटकारले. याच एपिसोडमध्ये ज्यूमने सांगितले होते की, जेव्हा त्याने आईला आर्ट स्कूलमध्ये टाक असे सांगितले होते, तेव्हा त्याच्या आईने त्याला नकार देत म्हटले की, तू त्या लायकीचा नाहीस. हे ऐकून लोक आणखी संतापले आणि म्हणाले की, आई आपल्या मुलाला अशाप्रकारे कसे काय वागवू शकते.
शोच्या शेवटी एक चांगली गोष्ट घडली; ती म्हणजे ज्यूमच्या पालकांनी त्यांची चूक सुधारण्याचा आणि त्यांच्या मुलासाठी चांगली पावले उचलण्याचा निर्णय घेतला. त्यांनी कबूल केले की, मुलाची मानसिक स्थिती खूप बिघडली आहे, त्यामुळे आता ते सर्वकाही ठीक करतील आणि त्याच्यासोबत अधिक वेळ घालवतील.