Baby Elephant Viral Video : कोल्हापूरमधील नांदणी मठातील महादेवी हत्तिणीला काही दिवसांपूर्वी गुजरातच्या वनतारा प्राणिसंग्रहालयात नेण्यात आले आहे. पण, या निर्णयाला कोल्हापुरातून खूप मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसतोय. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नांदणीकरांना नाइलाजाने महादेवीला ‘वनतारा’त पाठवावे लागले. पण त्यानंतर कोल्हापूरमध्ये संतप्त पडसाद उमटत आहेत, अनेक कोल्हापूरवासीयांनी महादेवी हत्तिणीसाठी अंबानींची जिओ सेवा वापरण्यास विरोध केला; तर अंबानींच्या मालकीच्या अनेक उत्पादन सेवा वापरण्यासही विरोध दर्शविला आहे. संपूर्ण कोल्हापूरवासींनी महादेवीला परत आणण्यासाठी मोठी जनचळवळ उभारली आहे. एकीकडे महादेवी हत्तिणीचा विषय गाजत असताना दुसरीकडे एका हत्तिणीच्या पिल्लाचा हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून अनेकांनी ‘वनतारा’ची खरी गरज या पिल्लाला असल्याचे म्हटले आहे.
व्हिडीओतील हत्तिणीच्या लहान पिल्लाने शिकाऱ्यांशी लढताना आपली सोंड गमावली. ज्यामुळे त्या पिल्लाला आता सोंडेशिवाय आयुष्य काढावे लागणार आहे. इतक्या लहान वयात एक अवयव गमावल्याने अनेकांनी महादेवी हत्तिणीपेक्षा आता खरे तर या पिल्लाला ‘वनतारा’च्या आश्रयाची गरज असल्याचे म्हटले आहे.
हत्तीसाठी सोंड हा एक सर्वांत महत्त्वाचा अवयव आहे. कारण- श्वास घेण्यापासून खाण्या-पिण्यापर्यंत अनेक गोष्टींसाठी हत्तीला सोंडेची गरज लागते. त्यात हत्तीची पिल्ले त्यांच्या सोंडेचा वापर सभोवतलचा परिसर शोधणे आणि माता किंवा कळपातील सदस्यांशी संवाद साधणे यासाठी करतात. एकूणच त्यांना जीव जगण्यासाठी सोंडेची गरज असते. पण, व्हिडीओत पिल्लानं अगदी लहान वयातच आपली सोंड गमावल्याचे दिसतेय. त्याला आयुष्यभर आता सगळ्या गोष्टींसाठी खूप अडचणींचा सामना करावा लागेल. अगदी लहान वयापासूनच त्याच्या या संघर्षाला सुरुवात झालीय.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, एका हत्तिणीचं गोंडस पिल्लू तिच्यामागोमाग फिरतेय; पण सोंड नसल्याने त्याला जीवन जगणे खूप असह्य झालेय. ते कधी पायाने माती उडवत खेळतेय, कधी घाबरून आईच्या मागे राहून फिरतेय, सोंड नसल्याने सर्व गोष्टी करणे त्याला खूप अवघड जात असावे, असे त्याच्याकडे बघूनच जाणवतेय. पण, सोबत असलेल्या आईच्या आधारामुळे त्याला सावरायला बळ मिळतेय. एकूणच हे दृश्य खूपच हृदयद्रावक आहे.
हत्तिणीच्या पिल्लाचा हा व्हिडीओ world_marathi_ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर युजर्स वेगवेगळ्या कमेंट्स करतायत. अनेकांनी महादेवी हत्तिणीचा संदर्भ देत या पिल्लाला ‘वनतारा’ची गरज असल्याचे म्हटलेय. तर अनेकांनी कोणावरही ही वेळ येऊ नये, असे म्हटलेय.
एका युजरने लिहिले की, प्लीज या हत्तीला ‘वनतारा’ आणि ‘पेटा’नं मदत केली पाहिजे. दुसऱ्याने लिहिले की, अनंत अंबानींनी या पिल्लाला ‘वनतारा’त सांभाळावं. तिसऱ्याने लिहिले की, अशा जनावरांना ‘वनतारा’त घेऊन जा, त्यांची काळजी घ्या; पण आमच्या महादेवी ऊर्फ माधुरीला परत द्या, कोल्हापूरकर चौथ्याने लिहिले की, अंबानीला हे नाही दिसत… कोल्हापुरातील मठातला हत्ती गुजरातला नेला… अंबानी जाहीर निषेध!