पंतप्रधान मोदी मंगळवारी ‘एक जग, एक सूर्य, वन ग्रिड’ या संकल्पनेबद्दल बोलले. सर्व काही सूर्यापासून बनलेले आहे यावर भर देऊन ते म्हणाले की, जगाने एकाच ग्रीडच्या धोरणावर काम केले पाहिजे जेणेकरून सौर उर्जेची व्यावहारिकता वाढू शकेल. भारतीय अंतराळ संस्था इस्त्रो लवकरच जगाला याबाबत कॅल्क्युलेटर उपलब्ध करून देईल, अशी घोषणाही पंतप्रधानांनी केली. या कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने एखाद्या भागात सौरऊर्जा निर्माण करण्याच्या क्षमतेचा अंदाज लावता येतो.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधनाच्या समतोल वापरातून २०७० पर्यंत शून्य उत्सर्जनाचे लक्ष्य साध्य करण्याची घोषणा केली असून त्याचे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी स्वागत केले आहे. बोरिस जॉन्सन यांनी याबद्दल बोलताना आपल्या भारत देशाचं आणि मोदींचं कौतुक केलं. त्यांनी त्यांच्या भाषणात “एक जग, एक सूर्य, वन ग्रिड, एक नरेंद्र मोदी” असं बोलेले. याचाच एक व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे.

( हे ही वाचा: भारतानं अफगाणिस्तानला पराभूत केल्यानंतर पाकिस्तानी क्रिकेट चाहते बिथरले! ट्विटरवर सुरू झाला #Shame ट्रेंड!)

ग्लासगो येथील जागतिक परिषदेत सोमवारी मोदी यांनी भारताची भूमिका मांडताना ही घोषणा केली असून भारतातर्फे तसे प्रथमच जाहीर करण्यात आले आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन म्हणाले की, भारताने २०३० पर्यंत आपली इंधनाची निम्मी गरज अपारंपरिक ऊर्जेतून भागविण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे. यातून कार्बनचे उत्सर्जन कित्येक अब्ज टनांनी कमी होणार आहे. जगभरात हवामान बदल रोखण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत, त्याला यामुळे मोठी मदत होणार आहे.