Pahalgam Terror Attack Shubham Dwivedi Video : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केल्याची घटना घडली. त्या हल्ल्यात २७ पर्यटक ठार झाले. धक्कादायक बाब म्हणजे दहशतवाद्यांनी लोकांना धर्म विचारून त्यांना ठार मारले. या भ्याड हल्ल्याचे विविध फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याच हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांत कानपूरमधील व्यापारी शुभम द्विवेदी (३१ वर्ष) याचाही समावेश आहे. पत्नी आणि कुटुंबातील ११ जणांसह तो काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेला होता. याच शुभमचा मृत्यूच्या एक दिवस आधीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात तो मित्र आणि कुटुंबासह आनंदात पत्ते खेळत असताना “मी सर्वांना हरवेन”, असे म्हणताना दिसतोय; पण दहशतवादी हल्ल्यात तो त्याच्या जीवनाचीच लढाई हरला.

त्याच्या कुटुंबीयांनीही विचार केला नसेल की, त्या रात्रीचे त्याचे ते हास्य त्याच्या आयुष्यातील शेवटचे असेल. दहशतवादी हल्ल्यात झालेल्या त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाचा सर्व आनंद आणि स्वप्ने आता उद्ध्वस्त झाली आहेत.

पहलगामला पोहोचताच दहशतवाद्यांनी केलं लक्ष्य

शुभम द्विवेदी १७ एप्रिल रोजी पत्नी आणि कुटुंबासह काश्मीरमध्ये पर्यटनासाठी पोहोचला होता. २२ एप्रिलच्या घटनेवेळी फक्त तो पत्नीसह पहलगामच्या ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन व्हॅलीमध्ये पोहोचला. त्यावेळी कुटुंबातील बाकीचे लोक खाली होते. शुभम तेथे पोहोचताच त्याला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.

रात्रीचे ते हास्य, आनंद ठरला शेवटचा

शुभमचा हल्ल्यातील मृत्यूच्या एक दिवस आधीचा एक भावनिक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये शुभम रात्री त्याच्या कुटुंबासह पत्ते खेळत आहे, यावेळी कुटुंबासह तो अगदी आनंदात हसत विनोद करताना दिसतोय. यावेळी शुभम पत्त्यांचा डाव खेळत असताना म्हणतोय, “मी सर्वांना हरवेन.” त्यावर कुटुंबातील इतर सदस्य हसताना दिसतायत.

शुभमचे वडील संजय द्विवेदी कानपूरमधील सिमेंटचे व्यापारी आहेत. बुधवारी झालेल्या घटनेच्या आधीच शुभम जम्मू आणि काश्मीरहून परतणार होता; पण अचानक ते रद्द झालं.

शुभमच्या चुलतभावाने घटनेविषयी माहिती देताना सांगितले की, दहशतवाद्यांनी प्रथम लोकांची नावं विचारली आणि गोळीबार सुरू केला. त्यात शुभमच्या डोक्यात गोळी लागली. त्याने असेही सांगितले की, भैया त्याच्या पत्नीसह पहलगाममध्ये होता. घटनेनंतर वहिनीने माझ्या काकांना फोन करून सर्व काही सांगितले. सध्या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शुभमचा मृतदेह सोडण्यात येईल.