पाकिस्तानात पूरस्थिती निर्माण झालल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. रस्ते, पूल आणि घरे पाण्याखाली गेल्याने लोकांवर मोठे संकट कोसळले आहे. अशा कठीण परिस्थितीतही पत्रकार आपले जीव धोक्यात घालून मैदानात उतरले आहेत. याचदरम्यान महिला पत्रकार मेहरुन्निसा हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ती बोटीत बसून पूरस्थितीचे वार्तांकन करताना दिसत आहे. आजूबाजूला उसळणाऱ्या पाण्याच्या जोरदार प्रवाह यांमुळे तिच्या चेहऱ्यावर उमटलेली भीती स्पष्टपणे जाणवत होती. कॅमेऱ्यासमोर बोलताना तिने कबूल केले की, मला खूप भीती वाटते आहे. प्लीज आमच्यासाठी प्रार्थना करा. बॅलन्स होत नाहीये. हा व्हिडीओ तिच्या चॅनेलने यूट्यूबवर टाकला आणि काही तासांतच तो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला.

नेटिझन्सनी तिच्या या प्रामाणिक भीतीची तुलना थेट पाकिस्तानचे बजरंगी भाईजान चित्रपटातील पात्र पत्रकार चाँद नवाब यांच्या रिपोर्टिंगशी केली आहे. काही जण तिचे घाबरलेले हावभाव पाहून हसले; तर अनेकांनी तिच्या धाडसाचं कौतुक करीत ती खरंच शूर आहे, असं म्हटलं. पाकिस्तानी पत्रकारांचे असे व्हायरल व्हिडीओ नवीन नाहीत. गेल्या महिन्यात अली मुसा रझा नावाच्या पत्रकाराचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला होता. रावळपिंडीतील चाहन धरणाजवळ तो पुराच्या वेगवान प्रवाहात अडकला. पाणी मानेपर्यंत पोहोचलेलं असतानाही तो मायक्रोफोन हातात धरून रिपोर्टिंग करीत होता. अचानक प्रवाहानं त्याला खेचलं आणि काही क्षणांनी फक्त त्याचा हात पाण्याबाहेर दिसला. त्यानंतर तो दिसेनासा झाला.

या घटना एकीकडे सोशल मीडियावर चर्चेचा आणि विनोदाचा विषय ठरत असल्या तरी दुसरीकडे त्या पाकिस्तानातील पूरस्थिती किती गंभीर आहे याचं वास्तवही उघड करतात. पुरामुळे शेकडो कुटुंबं बेघर झाली आहेत. अनेक ठिकाणी वीज, पाणी व दळणवळण व्यवस्था पूर्णपणे बंद झाली आहे. पत्रकारांचं धाडस कौतुकास्पद असलं तरी या कामात किती धोका असतो हेही यातून दिसून येतं.