व्हॉट्सअॅपवरील व्हायरल पोस्टमुळे जगणं मुश्किल झालेल्या अंध दाम्पत्याला आता व्हाट्सअॅपमुळेच मदतीचे हात मिळाले आहेत. पिंपरी-चिंचवडमधील लोखंडे दाम्पत्यांनी सोशल मिडीयावरील लोकप्रिय असलेल्या व्हॉटसअॅपचे चांगले आणि वाईट असे दोन्ही अनुभव घेतले आहेत. धर्मेंद्र आणि शीतल लोखंडे हे दोघे एका चौकात त्यांची गोंडस मुलगी समृद्धीला घेऊन बसले होते. मात्र एका समाजकंटकाने ही मुलगी त्याची नसल्याचा तर्क लावला आणि एका पोस्टसह फोटो व्हायरल केला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याच पोस्टने त्यांचं जगणं मुश्किल केल्याच्या बातम्या माध्यमांवर झळकल्या. व्हाट्सअॅपवर जशी चुकीची पोस्ट व्हायरल झाली तशीच त्याच्या सत्याचा उलगडा करणारी बातमी देखील वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर या कुटुंबियांच्या मदतीसाठी अनेक हात सरसावले आहेत. पिंपळे गुरवमधील मयूर नगरी वसाहत समृद्दीच्या लग्नापर्यंतचा आणि या कुटुंबाच्या पोटाचा प्रश्न सोडवणार आहे. यावेळी त्यांना अकरा हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. वाऱ्याच्या गतीने सोशल मीडियावर फिरणारा एक मेसेज अंध दांपत्याचा जीवनात अडथळा बनत होता. मात्र तोच मेसेज आता या दांपत्याच्या जीवनात नवसंजीवनी घेऊन आलाय.  गेल्या काही दिवसांपासून दाम्पत्त्याला नागरिकांनी जगणे मुश्किल केले होते.

या अंध दाम्पत्याला समृद्धी ही तीन वर्षांची मुलगी आहे. तिचा शिक्षणासह लग्नापर्यंतचा खर्च आणि कुटुंबातील अंध आई वडिलांचा खर्च पिंपळे गुरव येथील मयुरी नगरी वसाहत ही करणार आहे. या मदतीमुळे शीतल आणि धर्मेंद्र खूप खुश आहेत. ज्या मेसेजमुळे त्रास झाला, त्याच मेसेजने नवसंजीवनी दिल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच व्हॉटसअॅपवर मेसेज फॉरवर्ड करताना तो चुकीचा तर नाही ना याचा विचार करून तो पाठवावा, असे आवाहन अंध दाम्पत्याकडून करण्यात आले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: People help for blind couples daughter in pimpari chinchwad
First published on: 17-07-2017 at 16:43 IST