पिझ्झा हा सर्वांचा लाडका इटालियन पदार्थ असून, जगभरात सर्व ठिकाणी मिळणारा आणि सर्वांनाच पसंत पडणारा असा तो पदार्थ आहे. आता मूळचा पिझ्झा हा पदार्थ जरी इटलीचा असला तरी जगाच्या विविध भागांमध्ये तो बनत असल्याने या पिझ्झाचे आपोआपच वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. काही प्रकार सर्वांना पटणारे आणि आवडणारे असतात; तर, काही पिझ्झांची नावं ऐकूनच लोक कपाळाला हात लावतात.
आता गल्लीबोळातील दुकान असू दे किंवा पंचतारांकित हॉटेल, जागा आणि व्यक्तीच्या आवडीनुसार पिझ्झा बनवणारी व्यक्ती पिझ्झावर घातलेल्या पदार्थांमध्ये किंवा बनवण्याच्या पद्धतीत काहीतरी बदल हा करतेच.
तर असेच काही भन्नाट, जगावेगळे व विचित्र असे हे पिझ्झाचे सहा प्रकार आहेत; ज्यांच्या नावांची इंटरनेटवर तुफान चर्चा सुरू आहे. आता हे सहा पिझ्झा नक्की आहेत तरी कोणते ते पाहू.
इंटरनेटवर चर्चेत असणारे हे जगावेगळे सहा पिझ्झा :
१. स्नेक पिझ्झा
इंटरनेटच्या जगात ‘स्नेक पिझ्झा’ची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना आपल्याला दिसत आहे. हॉंगकॉंगमधील ‘पिझ्झा हट’ने हा स्नेक पिझ्झा तेथील १०० वर्षे जुने असलेल्या एका प्रसिद्ध रेस्टोरंटसोबत मिळून बनवला आहे. सीएनएनच्या [CNN] अहवालानुसार, पिझ्झावर टॉपिंग म्हणून काळे मशरूम, चायनीज हॅम व सापाच्या मांसाचा वापर केला जातो. हे सर्व पदार्थ सापाच्या सुपाचे [स्ट्यू] सर्वांत महत्त्वाचे घटक आहेत. त्याचप्रमाणे या नऊ इंचांच्या पिझ्झाची मर्यादित कालावधीतच विक्री केली जाणार आहे. हा स्नेक पिझ्झा केवळ २२ नोव्हेंबरपर्यंतच उपलब्ध असणार आहे, असे समजते.
हेही वाचा : Viral : बापरे! केवढे ते धाडस; पाळीव प्राणी म्हणून पाळलाय अजगर; पाहा त्याचा ‘हा’ व्हिडीओ….
२. पिकल [लोणचे] पिझ्झा
स्नेक पिझ्झाप्रमाणे यात फार काही विचित्र पदार्थ किंवा मांस घातलेले नसले तरीही पिकलसारखा पदार्थ पिझ्झावर घालून खाणे हे कुणाच्याच पचनी पडलेले नाही. हा पिझ्झा अमेरिकेतील पिझ्झा हट यांनी ठरावीक काळासाठी विक्रीसाठी ठेवला होता. ‘पिझ्झा हट’ने जेव्हा अमेरिकेतील लोकसांसाठी या पिझ्झाची घोषणा केली तेव्हा सध्याचे एक्स [X म्हणजे पूर्वीचे ट्विटर] या सोशल मीडियावर पिकल पिझ्झा या पदार्थासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या होत्या.
३. सुका मेवा पिझ्झा
काही काळापूर्वी गुजरातमधील अहाबादबादमधील खाऊ गल्लीत एक व्यक्ती सुका मेवा पिझ्झा विकत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. इन्स्टाग्राम या सोशल मीडियाच्या माध्यमातून @foodie_bhuro या हँडलने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पिझ्झा तयार करणारी व्यक्ती पिझ्झा बेसवर लाल रंगाचा सॉस लावून, त्यावर काजू व बेदाणे घालते. त्यानंतर ती व्यक्ती पिझ्झा बेक करून, त्यावर भरपूर चीज घालून, सुका मेवा पिझ्झा तयार करून देते, असे पाहायला मिळते. त्यावर लोकांनी तऱ्हेतऱ्हेच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
४. केळ्यांपासून बनवला पिझ्झा
या पिझ्झामध्ये केळी पिझ्झावर वरून न पेरता, चक्क केळ्यांचा वापर करून पिझ्झा बेस बनवला गेला आहे. इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील @yourdailydoseofkringe या हँडलने हा व्हिडीओ शेअर केला आहे. केळ्यापासून पिझ्झा तयार करण्यासाठी एक व्यक्ती पॅनमध्ये केळी चमच्याच्या मदतीने कुस्करून, त्यांना पिझ्झा बेससारखा आकार देण्याचा प्रयत्न करत आहे. नंतर त्याने हा बेस बेक करून घेऊन, त्यावर टोमॅटो सॉस पसरवून, मॉझरेला चीज घालून पुन्हा बेक करून घेतल्याचे आपल्याला पाहायला मिळते.
५. वडापाव पिझ्झा
इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील @bhukkadbhaiyaji_ या हँडलने आपल्या अकाउंटवरून, व्हायरल झालेल्या वडापाव पिझ्झाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या पिझ्झाच्या नावामुळे तो चवीला कसा लागेल किंवा कसा दिसेल याचा अंदाज काही जण लावत असतील; पण तो आपल्या नेहमीच्या वडापावपेक्षा बराच वेगळा दिसतो. या वडापाव पिझ्झासाठी हा पदार्थ बनवणाऱ्या व्यक्तीने पावाला मधोमध कापून घेऊन, त्यावर सॉस, मेयोनीज आणि मधोमध कापलेले वडे ठेवले आहेत. त्यावर चीज, कांदा, सिमला मिरची अशा वेगवेगळ्या भाज्या घालून, वेगळ्या प्रकारचे सॉस घालून तो बेक करून घेतला आहे. आता हा तयार वडापाव पिझ्झा तुकडे करून, खाण्यासाठी तयार झाला आहे. त्यावर अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. त्यामध्ये “वडापाव ला वडापावच राहू द्या रे”, “चांगल्या पदार्थांसोबत असे प्रयोग कुणीतरी थांबवा” अशा काहीशा प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
६. ओरिओ पिझ्झा
शेवट गोड, तर सगळं गोड’ असं म्हणत असली, तरी ही म्हण ‘ओरिओ पिझ्झा’साठी लागू पडत नाही. कारण- सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या पिझ्झाबद्दल लोकांच्या प्रतिक्रिया मिश्र स्वरूपाच्या आहेत. ओरिओ पिझ्झा हा, चॉकलेट, चॉकलेट चिप्स व ओरिओ अशा सर्व गोड गोष्टींचा भरपूर प्रमाणात वापर करून बनवला गेला आहे. जेव्हा हा पिझ्झा व्हायरल झाला तेव्हा लाखो लोकांनी या पिझ्झाबद्दल आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींना या प्रकारचा पिझ्झा ‘चविष्ट’ वाटत आहे; तर बाकी मंडळींनी या पिझ्झावर बंदी आणली पाहिजे, अशी मागणी केलेली पाहायला मिळेल.
जगात यापेक्षाही विचित्र चवीचे आणि वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जाणारे पिझ्झा आहेत. तरी या पिझ्झाची मात्र इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगलेली पाहायला मिळते.
