पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रशिया दौरा हा चर्चेचा विषय ठरत आहे. रशियात मोदी आणि नवाझ शरीफ यांच्या स्वागतामधील तफावत दर्शवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शरीफ यांच्या स्वागतासाठी मोजकी मंडळी उपस्थित असतानाच मोदींचे रशियन सैन्याने मानवंदना देऊन स्वागत केले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या चार देशांच्या दौऱ्यावर असून तिसऱ्या टप्प्यात मोदी रशियात दाखल झाले. भारत- रशिया वार्षिक परिषदेनिमित्त ते रशियात आले होते. या दौऱ्यात मोदींचे रशियातील विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले. विमानतळावर रशियाच्या सैनिकांनी मोदींनी मानवंदना देत त्यांचे स्वागत केले. मोदींसाठी विमानतळावर ‘रेडकार्पेट’ होते. याशिवाय रशियन सैन्याने त्यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ही दिले.
मोदींचे शाही स्वागत होत असताना नवाझ शरीफ यांचे स्वागत अत्यंत साधेपणाने केल्याचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. शरीफ विमानतळावर येताच अगदी मोजकी मंडळीच त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.यातील अनेक जण पाकिस्तानी दुतावासातील कर्मचारी आणि अधिकारी असल्याचे दिसते.
दरम्यान, मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांची गुरुवारी द्विपक्षीय चर्चा झाली. दोन्ही देशांमध्ये पाच महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. तर पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत पुतीन यांनी भारताशिवाय इतर कोणत्याही देशासोबत रशियाचे घनिष्ठ संबंध नसल्याचे म्हटले होते. पाकिस्तान आणि इतर देशांसोबतचे संबंध वाढत असताना रशिया आणि भारत यांच्यातील विश्वासावार आधारित असलेल्या मैत्रीच्या नात्यात कधीही बाधा येऊ देणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले होते.