भूतानचे राजे आणि त्यांचा परिवार चार दिवसांसाठी भारत भेटीवर आले आहेत. या दौऱ्यामध्ये राजे आणि राणीबरोबरच लहानग्या राजकुमाराने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले. भारतात आलेल्या या राजकुमाराचे सर्व स्तरातून जोरदार स्वागत झाले. इतकेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदीही या राजकुमारावर भलतेच खूश झाले. आपल्या भेटीदरम्यान मोदींनी या लहानग्याला काही भेटवस्तूही दिल्या. आता देशाच्या पंतप्रधानांनी दिलेल्या भेटवस्तू म्हणजे काय असतील, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर मोदींनी या लहानग्याला फिफा अंडर १७ वर्ल्डकपचा अधिकृत फुटबॉल आणि एक बुद्धीबळाचा पट भेट म्हणून दिला.

जिग्मे खेसर नामगैल वांगचुक आणि राणी पेमा जेतसून वांगचुक तसेच राजकुमार जिग्मे नामग्याल वांगचुक सध्या भारत भेटीवर आले आहेत. राजघराण्यातील या तिघांनी पररष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीही भेट घेतली. विमानतळावर सुषमा स्वराज यांनीही राजा आणि राजकुमाराला भेटवस्तू देऊन त्यांचे विशेष स्वागत केले.राजांचे २०११ मध्ये लग्न झाले असून, राणीचा स्वभाव खूप चांगला असल्याने ती देशाची काळजी घेण्यास समर्थ आहे, असे राजांचे म्हणणे आहे. भूतानमध्ये बहुपत्नीत्वावर कोणतेही बंधन नसताना आपण दुसरे लग्न करणार नसल्याचे वचन आपण राणीला दिल्याचेही राजांनी सांगितले. सध्या भारत आणि डोकलाम यांच्यात जोरदार संघर्ष सुरु असताना भूतानच्या राजाची ही भारत भेट महत्त्वाची मानली जात आहे.