kichen jugad : आजकाल सोशल मीडियावर नवनवीन जुगाड आणि भन्नाट प्रयोग व्हायरल होत असतात. कधी कोणी वेगळ्या पद्धतीने स्वयंपाक करतो, तर कधी साधी गोष्टही हटके पद्धतीने करून दाखवतो. याचदरम्यान एका मुलाने दाखवलेला एक अनोखा ‘कुकर टी जुगाड’ सोशल मीडियावर जबरदस्त चर्चेत आला आहे.
आपल्या रोजच्या आयुष्यात चहा हा केवळ पिण्याची गोष्ट नसून भावनांचा विषय आहे. घाईघाईने चहा पिणे असो किंवा संध्याकाळच्या गप्पांचा साथीदार असो, प्रत्येक घरात चहाचे वेगवेगळे विधी असतात. पण, चहा थेट प्रेशर कुकरमध्ये बनवणे? हे ऐकूनच लोकांना हसू आवरता येत नाही.
हा संपूर्ण व्हिडीओ एका अनोख्या पद्धतीने बनवलेल्या चहावर आधारित आहे. साधारणपणे आपण एका भांड्यात चहा बनवतो – पाणी उकळण्याची, पाने घालण्याची, दूध मिसळण्याची ही प्रक्रिया पद्धत आपण वापरतो. पण, या व्हिडीओमध्ये मुलाने प्रेशर कुकरमध्ये चहा शिजवला आहे, अगदी डाळ किंवा भाज्यांसारखा; त्यामुळे पहिल्यांदा पाहणाऱ्याला एकच प्रश्न पडतो, “हा खरोखर चहा आहे की आणखी काही?”
व्हिडीओमध्ये मुलगा अगदी आरामात कुकर गॅसवर ठेवतो, त्यात आधी पाणी टाकतो, मग साखर, चहा पावडर, किसलेलं आलं आणि शेवटी एक कप दूध; सगळं एकदम एकत्र करतो. पातेल्यात चहा करताना जसं आपण थोडे-थोडे जिन्नस घालत जातो, तशी काही काळजी इथे नाही. सगळं एकाचवेळी टाकून तो कुकरचं झाकण लावतो आणि दोन शिटी येईपर्यंत थांबतो.
पाहा व्हिडिओ
दोन शिटी झाल्यावर गॅस बंद करतो, कुकर थोडा थंड होऊ देतो आणि मग उघडून चहा गाळणीतून गाळतो. कपात ओतताना तो खुशीत म्हणतो, “चहा तयार!”हे पाहून अनेकांना वाटलं की चहा नाही तर जणू कुकरमध्ये डाळ भातच बनवला आहे. काहींना तर हा प्रकार ब्रेक्रफास्ट करताना जसा कुकर लावतो तसाच वाटला, म्हणजे चहा की डाळ.
हा व्हिडीओ Mosrrat Khan यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यांनी मजेत कॅप्शन दिलं – “अरे, आपण इतकी वर्ष चहा चुकीचा बनवत होतो!” हे कॅप्शन पाहून आणि व्हिडीओ पाहताच लोकांनी लगेच प्रतिक्रिया करायला सुरुवात केली. काहींना हा प्रयोग फारच गमतीशीर वाटला. एका युजरने लिहिलं – “हा चहा नाही, चहाचे सूप आहे!” दुसऱ्याने लिहिले, “हॉस्टेलवाल्यांसाठी भारी जुगाड! दोन शिटीत चहा रेडी!”
पण, सगळ्यांनीच या आयडियाचं कौतुक केलं असं नाही. चहाप्रेमींना हा प्रकार अजिबात आवडला नाही. त्यांचं म्हणणं चहा बनवण्याची एक रीत आहे. चहा उकळताना येणारा सुगंध वाफ, त्याचा रंग, हळूहळू येणारी चव हे सगळं कुकरमध्ये बनवताना हरवतं. काही लोकांनी तांत्रिक कारणही सांगितलं. त्यांच्यानुसार, कुकरमध्ये जास्त उष्णता होते म्हणून दूध फाटण्याची शक्यता असते, चहा कडवट होऊ शकतो आणि त्याचा सुगंधही कुकरमध्येच बंद होतो, त्यामुळे हा जुगाड सगळ्यांनाच पसंत पडला नाही.
