पुण्यात एका महिलेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर समाजमाध्यमांवर या घटनेचे पडसाद उमटताना दिसत आहेत. काहीजण या प्रकरणाला पाठिंबा देत आहेत तर काहींनी या प्रकारावर कठोर शब्दांत टीका करणाऱ्या पोस्ट फेसबुकवर टाकल्या आहेत. अनेकांनी जात-पात काढणाऱ्यांवर शेलक्या शब्दांत ताशेरे ओढले आहेत तर काहींनी या असल्या प्रकरणांवर उपहासात्मक चिमटे काढले आहेत.

सोवळे प्रकरणाबद्दल डोंबिवलीतील शेखर जोशी यांनी ‘घरात सोवळे-ओवळे किती व कसे पाळायचे हा वैयक्तिक प्रश्न आहे. डॉ. मेधा खोले यांनी जी भूमिका घेतली त्यात काही चुकीचे नाही.’, असे ट्विट करत या प्रकरणाचे समर्थन केले आहे.

तर काहींनी हवामान खात्यातील उच्चपदस्थ महिलेकडून अशी अपेक्षा नसल्याचे आपल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे. तक्रार करणाऱ्या मेधा खोले यांच्यावर टीका करताना ठाण्यातील सौरभ गणपते फेसबुवर लिहीतात, ‘कायद्याचा किस पाडायला गेलं तर डॉ. मेधा खोले यांना एकवेळ योग्य ठरवता येईलही. परंतु व्रतवैकल्य, उपास-तापास, सोवळं ओवळं, अनुष्ठान, सवाष्ण, चातुर्मास आणि कसली कसली अडगळ महत्वाची मानणारी महिला हवामान खात्यात एवढ्या उच्च पदावर असते ही लाजिरवाणी गोष्ट आहे. वैज्ञानिक क्षेत्रात जायचं आणि पुराणातले संदर्भ जपत मध्ययुगीन जातीय मानसिकता जपायची. हा देश रामभरोसे जगतो हेच खरं.’

पुण्यातील शंतनू पांडे यांनी ‘मी ब्राह्मण असल्याची मला लाज वाटते’ या आशयाची पोस्ट लिहिली आहे. वाचा काय म्हणतात शंतनू आपल्या पोस्टमध्ये…

या संदर्भात श्रीधर पाटील फेसबुकवर म्हणतात, ‘पुण्यात सोवळे मोडले म्हणून मराठा महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. जर मराठे धार्मिक पूजा विधी कार्यात शुद्र कसे काय?’

जिथे हा प्रकार घडल्या त्या पुण्यातील दादाभाऊ अभंग यांनी फेसबुवरून ‘मोर्चेवाल्यां’चे या गोष्टीकडे लक्ष द्यावे असा चिमटा काढला आहे. ते आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, ‘सोवळे मोडले, धर्म बाटला पुण्यात मराठा महिलेवर गुन्हा दाखल…कुठे गेले? लाखोंचे मोर्चावाले..’

उत्तम पवार यांनी आता सोवळे पाळणारे भाजीपाला, अन्नधान्य पिकवत नाहीत मग ते आता काय कच्चे केळं खाणार का? असा सवाल सोवळे पाळणाऱ्यांना केला आहे.

श्रीकांत बर्वे यांनी फेसबुक पोस्टमध्ये ‘सोवळ पाळणे हे वैज्ञानिक दृष्ट्या चुकीचे आहे हे सिद्ध झाल आहे का?’ असा सवाल केला आहे.

सोलापूरच्या मयुरेश लंकेश्वर यांनी खोले यांना या खटल्यासाठी फेसबुकवरुन ‘हवामान खात्याच्या अंदाजाइतक्याच लांब ढगातून शुभेच्छा’ दिल्या आहेत. मयुरेश काय म्हणतात तुम्हीच वाचा…

अशाच प्रकराची प्रतिक्रिया लिहिताना सुहास भौसे यांनी फेसबुवर म्हटले आहे, ‘आणि हो, समोर आलेल्या माहितीनुसार हवामान खात्यातील शास्त्रज्ञ सु श्री खोलेबाई यांचं सोवळं दोन वर्षांपासून बाटत असलं तरी या दोन वर्षापासूनच राज्यात पाऊस चांगला पडतोय हा आश्चर्यजनक योगायोगच…’

लोकशासन आंदोलन पार्टीच्या बी. जी. कोळसे पाटील यांनी फेसबुक पोस्टमधून या प्रकरणावर कठोर शब्दांत टीका केली आहे. ते आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, ‘अवैज्ञानिक पुरोहित वर्ग हा हिंदू धर्माचा कायमच मारेकरी राहिलेला आहे. कारण शीख, बौद्ध, जैन, लिंगायत हे समाज हिंदुपासून, पुरोहितांना विरोध, विवेकबुद्धी, वैज्ञानिकदृष्टी, समतेचा एल्गार करुनच वेगळे झालेले आहेत. इस्लाम धर्मांतील प्रवेश, हा देखील पुरोहितांच्या छळापासून सुटकेसाठी, खालच्याच वर्णातील लोकांनी केलेला आहे.’

पण प्रत्येकजण सिरीयस होण्याऐवजी काहीजणांनी या प्रकरणावर कोपरखळ्या मारल्या आहेत. यामधीलच एक आहेत ठाण्याचे विजय गागरे ते या प्रकरणाबद्दल फेसबुकवर लिहितात की, ‘म्हणजे एकंदरीत सोवळ प्रकरण दोन बायकांचं आहे तर… मग उगाच अख्खा फेसबुक जात-पात काढत बसलाय या बायकांच्या नादी लागून…’

मुंबई हायकोर्टात वकील असणारे राजेश टेकाळे यांनी फेसबुवर पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत थेट मुख्यमंत्र्यांना म्हणजेच राज्याच्या गृहमंत्र्यांना अडचणीत आणल्याचे म्हटले आहे. त्यांनी फेसबुकवर पोस्ट केलेला हा फोटो आणि मजकूर पाहा

सत्यजित पाटील यांनी खोले यांच्यावर टीका करताना ‘पोरगी शिकली न अधोगती झाली’ असे आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.