D Mart Viral Pati: पुणेरी पाट्या हा वर्षानुवर्षे चर्चेत राहिलेला विषय आहे. पुणेकरांच्या या पुणेरी पाट्या जितक्या वाचायला मजेशीर असतात, तितक्याच त्या खोचकपणे चांगला संदेशही देऊन जातात. पुणेकरांची शान असलेली ही पाटी अनेकदा लोकांचा अपमान करते; पण नियम म्हणजे नियम आणि त्याचं पालन केलंच पाहिजे, असा धडाही शिकवून जाते.
पुणेरी पाट्यांचा थाटच तसा विशेष असतो. या पाट्या फक्त पुण्यातच नाहीत, तर जगभरात प्रसिद्ध आहेत. पुणेकऱ्यांच्या या पाट्यांचं कौतुक तसे अनेक जण करतात; पण त्यांच्यावर अनेकदा टीकाही होते. पण, सध्या थेट डी-मार्टमध्येही एक वेगळीच पाटी लावली गेली आहे. ही पाटी सोशल मीडियावर व्हायरल होतेय, जी पाहून डी-मार्टला गेल्यावर नक्कीच ती गोष्ट करणं टाळाल.
व्हायरल व्हिडीओ (Puneri Pati D-Mart Viral Video)
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्ही पोट धरून हसाल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, डी-मार्टमध्ये एक खास पाटी लावली आहे, जी वाचून काही जण नक्कीच स्वत:ला नकळत त्या पाटीवरील वाक्याशी जोडून पाहतील. या पाटीवर असं काही लिहिलंय की, ज्यानं सध्या ग्राहकांचं लक्ष वेधलं गेलंय. या पाटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे आणि अनेक जण त्यावर कमेंट करून आपापल्या प्रतिक्रिया मांडत आहेत.
डी-मार्टमधल्या या व्हायरल पाटीवर एक खोचक, पण थेट अशी एक गोष्ट लिहिलेली आहे. कृपया साखर व शेंगदाणे खाऊ नये, असं डी-मार्टमधल्या एका पाटीवर लिहिलं आहे. साखर आणि शेंगदाणे सुटे व उघडे असतात आणि त्यामुळे अनेक जणांना ती विकण्यासाठी ठेवलेली साखर आणि शेंगदाणे पटकन हात टाकून खाण्याचा मोह आवरता येत नाही. त्यांच्यासाठी डी-मार्टने ही पाटी लावल्याचं लक्षात येतंय. दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे अद्याप कळू शकलेले नाही. पण, अनेकांनी हा व्हिडीओ पुण्याचा असल्याचे मत मांडलं आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @drive_trendy या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, सध्या तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. तसेच व्हिडीओला ‘फुकटचे साखर शेंगदाणे, अखेर डीमार्टला कळलेच’ट अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच त्याला 419k व्ह्युज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं कमेंट करत लिहिलं, “अरे, यार शास्त्र असतं ते” तर दुसऱ्यानं “एवढी मोठी कंपनी आणि असा बोर्ड, असं तर रेग्युलर किराणा मालाचा दुकानदारपण बोलत नाहीत” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करीत म्हणाला, “यांच्यापेक्षा शेतकरी बरा, घ्या खा म्हणतो” तर एकानं “डी-मार्ट काजू, बदाम कधी टेस्टिंगसाठी ठेवणार” अशी कमेंट केली. तर “बहुतेक डी-मार्ट पुण्याचं आहे” अशीदेखील कमेंट एका युजरनं केली.