गुजरातमध्ये वडोदरा मुंबई रेल्वे मार्गावर मंगळवारी रात्रीच्या सुमारात एक आठ मीटर लांबीची मगर रेल्वेखाली आल्याने गंभीर जखमी झाली. मंगळवारी सकाळी ही मगर ट्रॅकवर पडल्याचं दिसून आलं. त्यामुळे या मगरीचा जीव वाचवण्यासाठी आणि तिला ट्रॅकवरुन बाजूला करण्यासाठी सुपरफास्ट राजधानी एक्सप्रेस २५ मिनिटं थांबून ठेवण्यात आली. प्राणी मित्रांनी येऊन या मगरीला ताब्यात घेईपर्यंत सर्व ट्रेन्सची वाहतूक थांबवण्यात आली होती. या मगरीला वाचवण्यासाठी अनेक गाड्या नियोजित वेळेपेक्षा ४५ मिनिटं उशीराने सोडण्यात आल्याचं टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
मात्र एवढे प्रयत्न केल्यानंतरही डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने या मगरीचा मृत्यू झाला. करजान रेल्वे स्थानकापासून पाच किलोमीटर अंतरावर एका गस्त घालणाऱ्या कर्मचाऱ्याला ही मगर जखमी अवस्थेत दिसून आल्यानंतर पटापट सुत्र हलली पण उपचाराआधीच मगरीचा मृत्यू झाला. वन्यजीव संरक्षक असलेल्या हेमंत वाधवान यांनी, “रात्री सव्वा तीनच्या सुमारास मला कारजान रेल्वे स्थानकातील स्थानक निरिक्षकांचा फोन आला होता. स्टेशन मास्तरांनी ट्रॅकवर मगर जखमी अवस्थेत पडल्याची माहिती दिली. त्यानंतर आम्ही तातडीने स्टेशनच्या दिशेने निघालो,” वाधवान म्हणाले.
“मगर ज्या ठिकाणी जखमी अवस्थेत पडलेली त्या जागी लवकर पोहचणं शक्य नव्हतं. ती जागा अगदी मध्येच कुठेतरी होती. आम्ही आमच्या गाडीने कारजान रेल्वे स्थानकामध्ये पोहचल्यानंतर आम्हा त्या ठिकाणी रेल्वे अधिकाऱ्यांनी राजधानी एक्सप्रेस मागील २० मिनिटांपासून थांबून ठेवल्याचं सांगितलं. आम्हाला त्या ट्रेनने घटनास्थळाजवळ पोहचता यावं म्हणून ट्रेन थांबवून ठेवण्यात आलेली. नंतर घटनास्थळी पोहचल्यावर ट्रेन पुन्हा आम्ही ती मगर बाजूला करेपर्यंत पाच मिनिटं थांबून होती,” असं वाधवान म्हणाले.
Injured crocodile was lying on the track five kilometers away from Karjan railway station in Gujarat
Wildlife activist reached on information, got crocodile rescued
There was a serious injury on the head of the crocodile, no life left pic.twitter.com/GUAMt8dNBb
— Our Vadodara (@ourvadodara) September 15, 2021
वाधवान यांच्यासोबत असणाऱ्या प्राणीमित्र नेहा पटेल यांनी, “आम्ही तेथे पोहचलो तेव्हा मगर तिचा जबडा हलवत होती. मात्र तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली. आम्ही त्या ठिकाणी पोहचल्यानंतर काही मिनिटांमध्ये मगरीचा मृत्यू झाला,” अशी माहिती दिली. मगरीचा मृतदेह ट्रॅकवरुन बाजूला काढून गाड्यांना मार्ग मोकळा करुन देण्यात आला. किसान रेल्वेमधून या मेलेल्या मगरीला कारजान स्थानकात आणण्यात आलं आणि वनविभागाच्या ताब्यात हा मृतदेह देण्यात आल्याचं स्थानक प्रमुखांनी सांगितलं.