आपल्यापैकी अनेकांना जुनी नाणी किंवा स्टँप्स जमवायचा छंद असतो. आपल कलेक्शन किती मोठं आणि किती वैविध्यपूर्ण आहे हे दाखवण्यात या सगळ्यांना भारी कौतुक वाटतं. अनेकांना हा छंद म्हणजे ‘वेळेची आणि पैशाची नासाडी’ वाटत असली तरी अशा प्रकारची नाणी नोटा आणि पोस्टाच्या स्टँप्सना काही दशकांनी मोठी किंमत प्राप्त होते.
इंग्लंडमधल्या एका लिलावगृहात महात्मा गांधींच्या दुर्मिळ पोस्टाच्या स्टॅँपसना ५ लाख पौडांची (सुमारे सव्वाचार कोटी रूपये) बोली लागली आहे. हे स्टॅंप्स १९४८ साली छापण्यात आले होते आणि त्यावेळी त्यांची किंमत प्रत्येकी १० रूपये एवढी होती. भारतीय स्टँप्सना एवढी मोठी किंमत पहिल्यांदाच मिळाली आहे. याप्रकारच्या चार स्टॅंप्सचा यावेळी लिलाव करण्यात आला. एका ऑस्ट्रेलियन माणसाने एवढी प्रचंड बोली लावली आहे.
जगभरातल्या लिलावाच्या विश्वात भारतीय स्टँप्सना एवढी मोठी बोली लागत नाही, त्यामुळे साडेचार कोटींच्या बोलीने सगळे रेकॉर्ड्स मोडले गेले आहेत. तसंच एवढ्या प्रचंड रकमेची चर्चाही जगभर सुरु झाली आहे.
वाचा- तेजबहादूर यादवांच्या बडतर्फीने ट्विटरवर संतप्त प्रतिक्रिया
या स्टँप्सवर ‘service’ असे शब्द छापण्यात आले आहेत. भारताच्या तत्कालीन गव्हर्नर-जनरलच्या वापरासाठी हे स्टँप्स व्यवहारात आणले गेले होते. या प्रकारचे आता फक्त १३ स्टॅंप्स जगात उपलब्ध असल्याचं सांगितलं जातं.
वाचा- आता जा ‘व्हर्च्युअल ट्रिप’वर
दुर्मिळ भारतीय स्टँप्सना जगभर मागणी वाढली आहे. हे स्टँप्स आपल्याही संग्रही असावेत अशी जगभरात अनेक संग्राहकांची इच्छा आहे. या आधी अशाच प्रकारच्या स्टँप्सला एक लाख ६० हजार पौडांची (सुमारे सव्वा कोटींची) बोली लागली होती. आता याहूनही अधिक बोली लागल्यामुळे दुर्मिळ भारतीय स्टँप्सना जगभरात मागणी वाढल्याचं तज्ज्ञ सांगत आहेत.