Viral Video: श्वान हा प्राणी अतिशय इमानदार प्राण्यांमध्ये गणला जातो. घराची राखण करण्यापासून ते अगदी चोरांना शोधण्यापर्यंत माणसांना या श्वानांची खूप चांगल्या प्रकारे मदत होत असते. त्यामुळे कित्येक वर्षांपासून त्यांना माणसांचा अतिशय जवळचा मित्र मानले जाते. प्राण्यांमध्येही माणसांप्रमाणेच भावना, समजूतदारपण, दया आदी गुण असतात. भावनाशील व्यक्तींना त्यांच्यातील हे गुण नक्कीच दिसू शकतात. आज सोशल मीडियावर श्वानासंबंधित एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. आयुष्याची ११ वर्षे पोलीस सेवेसाठी देणाऱ्या श्वानाच्या निरोप समारंभाचा हा व्हिडीओ आहे.

तेलंगणातील आदिलाबाद येथील जिल्हा पोलीस मुख्यालयात एक हृदयस्पर्शी घटना घडली. आणि ती घटना म्हणजे पोलिसांच्या लाडक्या श्वानाचा निरोप समारंभ. तारा असे त्या लाडोबाचे नाव. ‘डेक्कन क्रॉनिकल’नुसार २२ जानेवारी २०१३ रोजी जन्मलेल्या या ताराने तेलंगणातील मोईनाबाद येथील इंटिग्रेटेड इंटेलिजेंस ट्रेनिंग अकादमी (IITA) येथून बॉम्बशोधक म्हणून आपला प्रवास सुरू केला होता. तिला नंतर आदिलाबाद येथे तैनात करण्यात आले; जेथे तिने परिश्रमपूर्वक सेवा केली आणि ती काल निवृत्त झाली. या निरोप समारंभाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गोल्डन रिट्रीव्ह श्वान ताराचा निरोप समारंभ व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.

हेही वाचा…‘प्रिय बेसनाचे लाडू…’ प्रवासादरम्यान आईने पाठवलेल्या लाडूचे ‘या’ पदार्थात झाले रूपांतर; पाहा डॉक्टरांची मजेशीर पोस्ट

व्हिडीओ नक्की बघा…

गोल्डन रिट्रीव्ह श्वान ताराने ११ वर्षे सेवा केली. त्यामुळे तिचा निरोप समारंभ खूप छान पद्धतीने साजरा केला गेला. व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, सर्वप्रथम गोल्डन रिट्रीव्ह श्वान ताराला पुष्पहार घालून सन्मानित करण्यात आले. नंतर तिच्यावर शालसुद्धा ओढली जात आहे. पुष्पहार आणि शाल ओढल्यानंतर पोलीस पथकाकडून जयघोष आणि टाळ्यांच्या कडकडाटाने तिचे कौतुक करण्यात आले. त्यानंतर तारा आराम करण्यासाठी टेबलावर झोपी गेलेली दिसली. या सर्व क्षणाचे खास फोटो आणि व्हिडीओही काढण्यात आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @PintodeepakD या एक्स (ट्विटर) खात्यावरून शेअर करण्यात आला आहे. ‘तेलंगणातील आदिलाबादच्या श्वान पथकातील सदस्य व बॉम्ब शोधण्यात तज्ज्ञ असलेल्या तारा यांचा निवृत्ती समारंभ. ती लॅब्राडोर रिट्रीव्हर कुटुंबातील आहे आणि तिने ११ वर्षे विभागाची सेवा केली आहे’, अशी कॅप्शन या पोस्टला देण्यात आली आहे. नेटकरी या निरोप समारंभातील त्यांना आवडलेल्या गोष्टी कमेंट्समध्ये सांगताना दिसत आहेत आणि श्वान ताराचे कौतुक करीत आहेत .