Rolls-Royce in Waterlogged Road: महाराष्ट्र आणि कोलकाता येथे कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. ग्रामीण भागात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, तर शहरी भागातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. दुकानं, घरात पाणी शिरल्यामुळं मोठं नुकसान झालं. अशातच कोलकाता मधील रस्त्यावर साचलेल्या पाण्यात एक रॉल्स रॉयस गाडी अडकली असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. कोट्यवधींची गाडी असूनही पावसाच्या पाण्यात फसल्यामुळे सोशल मीडियावर गमतीशीर मीम्स व्हायरल होत आहेत.
पावसाच्या पाण्यात फसलेल्या रॉल्स रॉयसचा व्हिडीओ अनेकजण शेअर करत आहेत. एकाने या व्हिडीओखाली लिहिले, “तुमच्याकडे जे आहे त्यात आनंद मानून घ्या. कारण जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा काहीच उरत नाही.” तर काही जणांनी पायाभूत सुविधांवर प्रश्नचिन्ह उभे केले. इतका कर देऊनही चांगले रस्ते मिळत नाहीत, अशी तक्रार काहींनी केली.
अनेक नेटिझन्सनी महागड्या रॉल्स रॉयसची खिल्ली उडवली. १० कोटींची गाडी पाण्यात फसली असताना अल्टो कोपऱ्यात उभी राहून हसत होती, अशी टिप्पणी एका युजरने केली. तर दुसऱ्या युजरने म्हटले की, लॉर्ड अल्टो जिंदाबाद. या टिप्पण्यांवरून भारतीय रस्त्यांसाठी अल्टो सारख्या तुलनेने स्वस्त गाड्या योग्य असल्याचे लोकांना सुचवायचे आहे.
सुपर्स कार्स ऑफ कोलकाता या इन्स्टाग्राम हँडलवर या गाडीचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ‘कोलकातामधील रस्त्यांचे दाहक वास्तव’, असे कॅप्शन सदर व्हिडीओला देण्यात आले आहे. तर व्हिडीओखाली दिलेल्या एका कमेंटमध्ये युजरने म्हटले की, तरीही काही लोक विचारतात की, बुद्धिवान लोक भारत सोडून का जात आहेत? खूपच दुःखद.
आणखी एका युजरने म्हटले की, भारतात अनेकजण आलिशान गाड्या आयात करत असतात. पण त्याच्यासाठी योग्य असे रस्ते आपल्याकडे नाहीत. रस्त्यांवर खड्डे आणि ठिकठिकाणी वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त आहेत.
चार दशकात सर्वाधिक पाऊस
पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकाता शहरात सोमवार रात्रीपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे एकूण १० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी नऊ जणांचा मृत्यू विजेचा धक्का लागून झाल्याचे सांगण्यात आले. कोलकात्यामध्ये गेल्या चार दशकातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस अभूतपूर्व असल्याचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले आणि नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले.
कोलकात्यात २४ तासांपेक्षा कमी अवधीमत २५१.४ मिमी पाऊस नोंदवण्यात आला. येथे १९८६पासून पडलेला हा सर्वात जास्त पाऊस असून, गेल्या १३७ वर्षांमध्ये हा सहाव्या क्रमांकाचा पाऊस असल्याची माहिती देण्यात आली. या अतिवृष्टीमुळे कोलकात्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. हवाई, रेल्वे आणि रस्ते वाहतुकीत मोठ्या प्रमाणात अडथळे आले, शैक्षणिक संस्था बंद राहिल्या आणि राज्यातील सर्वात महत्त्वाचा सण असलेल्या दुर्गापूजेसाठी दिली जाणारी सुट्टी आधीच जाहीर करावी लागली.