सध्या अभिनेता सलमान खान महाराष्ट्रामध्ये ‘धर्मवीर आनंद दिघे मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चमध्ये सहभागी झाल्याने चर्चेत आहे. या कार्यक्रमामध्ये त्याने आनंद दिघेंबद्दल केलेलं भाष्य असो किंवा बूट काढून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माँसाहेब आणि आनंद दिघेंच्या प्रतिमेला घातलेला हार या साऱ्या गोष्टी चर्चेत राहिल्या. एकीकडे सलमान या कार्यक्रमामुळे चर्चेत असतानाच दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये सलमानसारख्या दिसणाऱ्या एका व्यक्तीला म्हणजेच खऱ्याखुऱ्या आयुष्यातील जुडवाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. एएनआय या वृत्तसंस्थेनं यासंदर्भातील माहिती दिलीय.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशमधील लखनऊमध्ये असणाऱ्या ठाकूरगंज पोलीसांनी आझम अन्सारी नावाच्या व्यक्तीला आठ मे रोजी अटक केली आहे. आझमवर सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्याचा गुन्हा नोंदवण्यात आलाय. “लखनऊमधील आझम अन्सारीला पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान केल्याप्रकरणी दंड ठोठावला असून त्याला ठाकूरगंज पोलिसांनी एक दिवस पोलीस कोठडीमध्येही ठेवलं,” असं एएनआयने म्हटलंय. तसेच पुढे, “सोशल मीडियावर ही व्यक्ती अभिनेता सलमान खानची नक्कल करणारे व्हिडीओ पोस्ट करते,” असंही एएनआयने म्हटलंय.

आझम हा केवळ सलमान सारखा दिसतो म्हणून लोकप्रिय आहे. त्याला इन्स्टाग्रामवर ७७ हजार फॉलोअर्स आहेत. तो अनेकदा सलमानची नक्कल करणारे आणि त्याच्या बॉलिवूड पोजमधले फोटो, व्हिडीओ पोस्ट करत असतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युट्यूबवरही आझमच्या चॅनेलला एक लाख ६७ हजारांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत.