Sundari sundari viral video: संजू राठोडच्या नवीन गाण्याची भुरळ सगळ्यांनाच पडली आहे. नवरात्रीच्या दरम्यान त्याचं सुंदरी सुंदरी हे नवीन गाणं रिलीज झालं. त्यानंतर ते नेहमीप्रमाणेच व्हायरल झालं. संजू राठोडचं गाणं आणि ते व्हायरल झालं नाही असं आतापर्यंत झालेलं नाही. सोशल मीडियावर अनेकजण त्याच्या या नव्या गाण्यावर रील्स बनवत आहेत. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच या सुंदरीच्या ठेक्यावर ताल धरायला लावला आहे. असाच एक कुटुंबाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
महत्त्वाचं म्हणजे या व्हिडीओतला लहान मुलगा याचं प्रमुख पात्र आहे. आई-वडील आणि मुलगा अशा ट्रायोने या रीलमध्ये काही सेकंदातच धुमाकूळ घातला आहे. “संजूचं गाणं संजू नाही करणार असं होईल का”, अशा कॅप्शनसह हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. आणि विशेष म्हणजे या त्यांच्या व्हिडीओवर चक्क संजू राठोडनेही ‘सुंदर’ अशी कमेंट केली आहे. हा व्हिडीओ संजय काकडे या इंस्टाग्राम युजरने पोस्ट केला आहे. याआधीही या युजरने मुलगा आणि बायकोसोबत असे बरेच रील्स केले आहेत आणि यातून त्यांचं फॅमिली बाँडिंग दिसून येतं.
या व्हिडीओमध्ये आई-वडील आणि हा चिमुकला अगदी मनसोक्त नाचताना दिसत आहेत. यावर नेटकऱ्यांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे.
एका युजरने कमेंट केली आहे की, तुमचं फॅमिली बाँडिंग खूप छान आहे. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले की, सॉरी तुमच्या दोघांकडे लक्षच जात नाही कारण छोटूमुळे, खूपच गोड.
संजू राठोड या तरूण गायकाची गाणी सध्या चांगलीच व्हायरल होत आहेत. या गाण्यांवर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच थिरकताना दिसतात. लाखोंनी लोक या गाण्यांवर रील्स बनवत आहेत.