निवृत्तीचा दिवस कायम लक्षात रहावा असे प्रत्येकाला वाटते. हरियाणामधील फरिदाबाद येथील माध्यमिक शाळेमधील एका शिपायाने निवृत्तीसंदर्भातील आपले ४० वर्षांचे आगळेवेगळे स्वप्न पूर्ण करत दिवस संस्मरणीय केला. नोकरीच्या शेवटच्या शाळेतून घरी येण्यासाठी या शिपायाने चक्क हेलिकॉप्टर वापरले. नेहमीप्रमाणे बाईकने शाळेत गेलेला हा शिपाई घरी येताना मात्र हेलिकॉप्टरमधून थेट घराच्या अंगणात उतरला. सध्या या हौशी शिपायाची परिसरामध्ये चांगलीच चर्चा आहे.

सादपुरा या गावात राहणाऱ्या कुरे राम या शिपाई मागील अनेक वर्षांपासून हेलिकॉप्टरमध्ये बसण्याचं स्वप्न उरी बाळगून होता. अनेकदा त्याने याबद्दल घरच्यांना बोलूनही दाखवले. मात्र त्याच्या घरचे तसेच ओळखीचे त्याचे स्वप्न ऐकून त्याला वेड्यात काढायचे. मात्र निवृत्तीच्या दिवशी कुरे राम यांनी शाळेतून घरी येण्यासाठी हेलिकॉप्टर बूक केले. सादपुरा गावापासून दोन किलोमीटरवर असणाऱ्या निमका येथील शाळेच्या मैदानातून हेलिकॉप्टर उडाले आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये ते गावामध्ये सपाट करुन तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या ‘हॅलीपॅड’वर उतरले.

कुरे राम यांचे वरिष्ठ बंधू आणि गावचे सरपंच असणाऱ्या शिव कुमार यांनी याबद्दल न्यूज १८ ला विशेष मुलाखत दिली. ‘निवृत्तीच्या आदल्या दिवशी माझा भाऊ माझ्याकडे आला आणि मला माझ्या नोकरीचा शेवटचा दिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करायचा आहे असं सांगितलं. हेलिकॉप्टरने कुटुंबासोबत प्रवास करण्याचे त्याचे स्वप्न होते,’ अशी माहिती कुमार यांनी दिली.

हेलिकॉप्टरमधून नोकरीच्या शेवटच्या दिवशी घरी येण्याची कुरे यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी ३ लाख ३० हजार रुपये जमवले. त्यानंतर त्यांनी हेलिकॉप्टर बूक केले. या हेलिकॉप्टरमधून कुरे यांच्या कुटुंबातील सर्वजण शाळेतून घरी आले. या सर्वांना आणण्यासाठी हेलिकॉप्टरला आठ फेऱ्या माराव्या लागल्या. ‘आमचे कुटुंब श्रीमंत नाही. आमच्याकडे शेत जमीनही नाही. मात्र त्याचा अर्थ आम्ही आमची स्वप्न पूर्ण करु शकत नाही असा होत नाही. माझ्या भावाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमचे सर्व कुटुंब एकत्र आल्याचा विशेष आनंद आहे’ असं मत कुमार यांनी या हेलिकॉप्टर प्रवासानंतर बोलताना नोंदवले.