Air India Flight Viral Video: एकीकडे उड्डाण सुरक्षेवर लक्ष ठेवण्यासाठी कडक नियम असतात आणि दुसरीकडे काही प्रवासी अशा बेदरकारपणाचं उदाहरण देतात की, अंगावर शहारा यावा. अशीच एक घटना समोर आली आहे, जिथे भारतीय प्रवाशांनी फ्लाइटच्या लँडिंगदरम्यान नियमांची अक्षरशः पायमल्ली केली आहे.
हे विमान आहे की लोकल ट्रेन? सीटबेल्टचा सिग्नल सुरू असतानाही प्रवासी उभे राहिले, क्रू विनवण्या करत राहिला, पण कोणी ऐकलंच नाही. एका क्षणात नियम तोडणाऱ्या प्रवाशांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खळबळ उडवत आहे. हा व्हिडीओ केवळ प्रवाशांची बेफिकिरी दाखवत नाही, तर आपल्या समाजात ‘सिव्हिक सेन्स’ किती उथळ झाला आहे, यावरही प्रश्नचिन्ह उभं करतो. हे दृश्य पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही की हे आंतरराष्ट्रीय विमान आहे.
ही घटना बँकॉकहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइटची आहे, जिथे विमान लँड होत असताना काही प्रवासी आपल्या जागेवरून उभे राहिले, तेही सीट बेल्ट साइन ऑन असतानाच.
व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतं की, विमान उतरण्याच्या क्षणी काही प्रवासी उठून उभे राहतात आणि काही तर थेट सामान घेण्यासाठी ओव्हरहेड कंपार्टमेंट उघडतात. केबिन क्रू वारंवार विनंती करत राहतं, “कृपया आपल्या सीटवर बसा, सीट बेल्ट घाला”, पण कोणाचंच लक्ष जात नाही. ही केवळ विनंती नव्हे तर नियमांचं उल्लंघन असून अपघाताला निमंत्रण देणारं वर्तन होतं.
हा व्हिडीओ @storychaplin या इन्स्टाग्राम युजरने शेअर केला असून त्याला ३४ लाखांहून अधिक व्ह्युज आले आहेत. त्यांनी लिहिलं, “जग आपला द्वेष का करते?” कारण हे त्यांचं भारतात परत येतानाचं शेवटचं विमान होतं आणि तिथे त्यांना ‘सिव्हिक सेन्स’चा सर्वात वाईट अनुभव आला.
एका माजी एअर होस्टेसनेही कमेंटमध्ये लिहिलं, “भारतीय फ्लाइट्समध्ये प्रवाशांना हँडल करणं सोपं नसतं.” अनेकांनी प्रवाशांच्या अशा वागणुकीवर संताप व्यक्त केला. एकाने लिहिलं, “हे लोक १५ सेकंद आधी उभे राहतात आणि १० मिनिटं गॅलरीत अडकतात, त्यानंतर सामानासाठी अर्धा तास बेल्टवर थांबतात!”
येथे पाहा व्हिडीओ
या व्हिडीओने एक गंभीर प्रश्न पुन्हा उपस्थित केला आहे, आपल्याला नियम माहीत नाहीत की आपणच ते मोडण्यात ‘हुशारी’ समजतो?
सुरक्षिततेसाठी विमानात दिलेले नियम सर्व प्रवाशांसाठी अनिवार्य असतात. त्याच्याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे फक्त स्वतःचं नव्हे तर संपूर्ण विमानातील प्रवाशांचं आयुष्य धोक्यात घालणं आहे.