Indian railway video: भारतीय रेल्वे प्रवाशांमध्ये स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन हा पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एक रेल्वे कर्मचारी चालत्या रेल्वे डब्यातून कचरा फेकताना दिसत होता. त्यामुळे नागरिकांची जागरूकता आणि रेल्वेची ऑनबोर्ड हाऊसकीपिंग सिस्टीम यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. प्रवाशांनीदेखील या प्रकारावर नाराजी व्यक्त केली असून, अशा घटनांना जबाबदार असणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.

४ नोव्हेंबर २०२५ रोजी सियालदह-अजमेर एक्स्प्रेस (१२९८७)मध्ये एक कर्मचारी ट्रॅकवर थेट कचऱ्याची पिशवी फेकताना दिसला. हा प्रकार प्रवासी अभिषेक सिंग यांनी पाहिला आणि त्यांनी त्यासंबंधीचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. प्रवाशाने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला; पण कर्मचारी संजय सिंगने कुणाचेही ऐकले नाही .

त्या घटनेनंतर भारतीय रेल्वेने तातडीने कारवाई केली. संजय सिंगला नोकरीतून बडतर्फ केले गेले आणि त्याने केलेल्या दुष्कृत्यासाठी जबाबदार कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, भविष्यात अशी घटना होऊ नये म्हणून कर्मचारी प्रशिक्षण शिबिर घेऊन, त्यामध्ये कचरा फक्त योग्य ठिकाणी टाकण्याचे प्रशिक्षण दिले जाईल.

पाहा व्हिडिओ

सोशल मीडियावर या घटनेसंदर्भात लोकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काहींनी या घटनेवर त्वरित कारवाई न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली; तर काहींनी प्रवाशाचा प्रयत्नाचे कौतुक केले. एका वापरकर्त्याने म्हटले, “हे पाहून मला आश्चर्य वाटते की, कोणीही त्याला थांबवण्याचा प्रयत्न का करीत नाही? आपण सतत असे गुन्हे पाहतो आणि काही करीत नाही.” तर दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटले, “त्याचा चेहरा पाहा, तो गर्वाने हे करत आहे.” या घटनांमुळे रेल्वेमध्ये स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

प्रवाशांच्या तक्रारींची दखल घेऊन, भारतीय रेल्वेने तत्काळ कारवाई केली आहे आणि कर्मचाऱ्याला काढून टाकले आहे; परंतु अशा घटनांबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता आणि जबाबदारी वाढवण्यासाठी सोशल मीडियावरील चर्चा महत्त्वाची ठरली आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सातत्यपूर्ण प्रयत्न केले जाणार आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.