Should I leave My 85 LPA Job For 96 LPA Work From Home Job With USA Company: वर्षाला ८५ लाख रुपये पगार असलेल्या हैदराबादमधील एका तरुणाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर नोकरीविषयी एक सल्ला मागितला आहे. आपल्या पोस्टमध्ये या तरुणाने, अमेरिकेतील एका स्टार्टअपची अंदाजे ९६.६ लाख रुपयांच्या वर्क फ्रॉम होम नोकरीची ऑफर स्वीकारावी का? असा प्रश्न युजर्सना विचारला आहे. या तरुणाच्या पोस्टमुळे नोकरीची सुरक्षा, कर आणि करिअर जोखीम यावर चर्चा सुरू झाली आहे.
ही ऑफर स्वीकारणे योग्य आहे का?
“मी भारतातील माझी वार्षिक ८५ लाख रुपयांची नोकरी, अमेरिकन स्टार्टअपच्या ९६ लाख रुपयांच्या वर्क फ्रॉम होम ऑफरसाठी सोडावी का?” या शीर्षकाच्या पोस्टमध्ये तरुणाने म्हटले आहे की, तो सध्या हैदराबादमध्ये नोकरीला आहे. परंतु अमेरिकेतील एका स्टार्टअपने त्याच्याशी संपर्क साधला आहे. ज्यांनी त्याला ९६ लाख रुपये वार्षिक पगार आणि वर्क फ्रॉम होमची ऑफर दिली आहे.
रेडिटवरील या पोस्टमध्ये तरुणाने विचारले की, “मला समजते की सल्लागाराची नोकरी मला कर वाचवण्यास मदत करू शकते, परंतु पगारातील थोड्या फरकासाठी सुरक्षित नोकरी सोडून सल्लागाराचे पद स्वीकारणे योग्य आहे का?”

सोशल मीडियावरील प्रतिक्रिया
या तरुणाच्या रेडिट पोस्टवर अनेक युजर्स मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया व्यक्त करू लागले आहेत. काहींनी अमेरिकेतील नोकरीविरुद्ध इशारा दिला आहे, तर काहींनी म्हटले आहे की, जर त्यांना अमेरिकेत स्थलांतरित व्हायचे असेल तर ही नोकरी फायदेशीर ठरू शकते.
एका युजरने प्रतिक्रिया देताना म्हटले की, “ही खूपच वाईट डील वाटतेय. थोड्याशा पगारवाढीसाठी सुरक्षित नोकरी सोडणे पटत नाही.”
“पगारातील फरक जास्त नाही. मी सल्ला देतो की, तुम्ही दोन्ही नोकऱ्यांची तुलना करा, शांतपणे विचार करा आणि मग योग्य वाटेल असा निर्णय घ्या”, असे दुसऱ्या एका युजरने सुचवले.
आणखी एक युजर म्हणाला, “हे फायद्याचे नाही भाऊ, वर्क फ्रॉम होम म्हणजे ते तुम्हाला कधी कामावरून काढून टाकतील ते तुम्हाला कळणारही नाही.”
ऑफरचे फायदे-तोटे
या ऑफरचे फायदे-तोटे सांगताना एक युजर म्हणाला की, “या ऑफरचा फायदा असा आहे की, तुम्हाला अधिक शिकण्याच्या संधी मिळेल, हातात अधिक पगार येईल आणि फ्रीलान्सही करता येईल. तोट्यांचा विचार केला तर नोकरीच्या सुरक्षेचा धोका अधिक आहे. अमेरिकेतील टीमशी आणि कामाच्या तासांबरोबर जुळवून घेणे कठीण होऊ शकते.”
