केन्या या आफ्रिकन देशाला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. दुष्काळाचा परिणाम येथील वन्य प्राण्यांवरही होत आहे. येथील वजीर परिसरात असलेल्या साबुली वन्यजीव अभयारण्यात अन्न व पाण्याअभावी ६ जिराफांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतरचे फोटो जगभरात सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या हृदय पिळवटून टाकणाऱ्या छायाचित्रांमध्ये अन्न आणि पाण्याअभावी जिराफांचा मृत्यू झाल्याचं दिसतंय. हे जिराफ पाण्याच्या शोधात एका सुकलेल्या जलाशयाजवळ आले होते, तेथे ते चिखलात अडकले. जिराफ इतके अशक्त झाला होते की चिखलातून बाहेर पडू शकले नाहीत आणि तिथेच वेदनेने अन्न-पाण्याशिवाय त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, जलाशयातील उरलेले पाणी दूषित होऊ नये म्हणून मृतदेह तेथून बाहेर काढण्यात आले.
अलजजीराने दिलेल्या वृत्तानुसार, केनियाच्या उत्तरेकडील भागात सप्टेंबरपासून सरासरीच्या ३०% पेक्षा कमी पाऊस पडला आहे, ज्यामुळे गंभीर दुष्काळ पडला आहे. पावसाअभावी वन्य प्राण्यांवर वाईट परिणाम झाला आहे. पशुपालक समुदायांचे जीवन देखील मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहे. जनावरांसाठी अन्न व पाण्याची व्यवस्था करणे अवघड झाले आहे.
“दुष्काळाचा वन्य प्राण्यांना सर्वाधिक धोका असतो. सुरुवातीला पाळीव प्राण्यांना मदत केली जात होती, परंतु वन्यजीवांना नाही, आणि आता चारा आणि पाण्याअभावी वन्यप्राण्यांचे हाल होत आहे. नदीकाठच्या शेतीच्या कामांमुळे जिराफांना पाण्यात जाण्यापासून रोखले गेले आहे, ज्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे,” असे बोर-अल्गी जिराफ अभयारण्यात राहणारे इब्राहिम अली यांनी स्थानिक न्यूज वेबसाइट द स्टारला सांगितले.
तर, शेजारील गारिसा परगण्यातील ४ हजार जिराफ दुष्काळामुळे नामशेष होण्याचा धोका आहे, असा अहवाल द स्टारने दिला आहे.