बिहारमध्ये दारूबंदी कायद्याची अमलबजावणी कठोरपणे राबवली जात आहे. मात्र असं असलं तरी या ना त्या माध्यमातून तळीरामांपर्यंत दारू पोहोचत असल्याचं चित्र आहे. दारूबंदीमुळे दारूचा भावही वधारला आहे. त्यामुळे दारू तस्करीला उधाण आलं आहे. आता पटणामध्ये एका दारू तस्करी करणाऱ्या रॅकेटचा भंडाफोड झाला आहे. एलपीजी सिलेंडरमध्ये दारू लपवून त्याची तस्करी केलं जात असल्याचं समोर आलं आहे. मात्र याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून दारू जप्त केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या व्यक्तीचं नाव भूषण राय असून सोनपूरच्या सबलपूरमधील निवासी आहे. सबलपूरहून होडीत बसून प्रवास करत होता. त्याने सायकलवर सिलेंडर बांधला होता. त्यात दारुच्या बाटल्या होत्या. आरोपी जसा कदमघाटाजवळ पोहोचला तसंच पोलिसांनी त्याची झाडाझडती घेतली. तेव्हा सिलेंडरचा खालचा भाग कापल्याचं दिसू आलं. जेव्हा पोलिसांनी झाकण उघतात तसं काढलं तेव्हा त्यांना सिलेंडरमध्ये २० लिटर देशी दारू सापडली. त्यानंतर त्याच्या बॅगेत २४ लिटर दारू होती. अशी एकूण ४४ लिटर दारू पोलिसांनी जप्त केली.

Emotional Video: पाच वर्षांपूर्वी चोरीला गेलेला कुत्र्याने मालकाला पाहिलं आणि…

बिहार दारू प्रतिबंध सुधारणा कायदा २०२२ नुसार, पहिल्यांदा गुन्हा करणाऱ्या गुन्हेगाराने २,००० ते ५,००० रुपयांपर्यंतचा दंड भरला नाही तर एका महिन्यासाठी तुरुंगवास होऊ शकतो. कायद्यात सुधारणा करण्यापूर्वी दंडाची रक्कम ५० हजार रुपये इतकी होती. बिहार विधानसभेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही दारू पिणाऱ्या लोकांना पापी म्हटले होते. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील बिहार सरकारने एप्रिल २०१६ मध्ये दारू विक्री आणि सेवनावर पूर्णपणे बंदी घातली आहे.