Snake Abuse Caught On Camera: रील बनवण्यासाठी लोक काय करतील काही सांगता येत नाही. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, हा व्हिडीओ बघून तुम्हाला भीती तर वाटेलच पण तुमचा संतापही होईल. केवळ रिल बनवण्यासाठी म्हणून काही तरूणांनी अजगर आणि कोब्राचा छळ केल्याचा हा व्हिडीओ आहे.

कर्नाटकातील शिवमोग्गा इथून सापांच्या अत्याचाराची ही घटना समोर आली आहे. काही तरूणांनी दोन रॉक अजगर आणि एका कोब्राचा छळ केल्याची माहिती मिळत आहे. अगुम्बे रेनफॉरेस्टमध्ये घडलेला हा प्रकार रील बनवण्यासाठी रेकॉर्ड करण्यात आला होता. या छळाचे व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत.

या व्हिडीओमध्ये एक माणूस एका सापाच्या तोंडाला चिकटपट्टी गुंडाळताना दिसत आहे, तर दुसरा एक जण त्यांना धरून उभा होता. इंस्टाग्राम रील बनवण्यासाठी व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आरोपीची ओळख मोहम्मद इरफान म्हणून झाली आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तो फरार झाल्याचे वृत्त आहे. या व्हिडीओमध्ये आरोपीसह असणारे इतर लोक हा सर्व छळ उभे राहून पाहताना दिसत आहेत. डेक्कन हेराल्डने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना सोमवारी शिवमोग्गा इथल्या इंदिरानगरमधील माथुर रोडवर घडली.

इरफान हा स्वत:ला शिवमोग्गा इथला ‘साप वाचवणारा’ असा म्हणतो. यानंतर इरफान रस्त्यावर साप ओढत असल्याचे आणि त्याचे मित्र खांद्यावर साप घेऊन जातानाचे अनेक व्हिडीओही समोर आले आहेत. भद्रावती वन अधिकाऱ्यांनी तातडीने यावर कारवाई केली आहे. या व्हिडीओवर अनेकांनी संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. वनमंत्री ईश्वर खांड्रे यांच्या कार्यालयाकडून आलेल्या निर्देशांनुसार, वन अधिकाऱ्यांनी शिवमोग्गा इथल्या इरफानच्या घरावर छापाही टाकला. यामध्ये तीन भारतीय रॉक अजगर आणि दोन कोब्रा ताब्यात घेण्यात आले आहे. हे सर्व सरपटणारे प्राणी शेड्यूल-१ प्रजातीचे आहेत. या प्रकरणातील व्यक्तींवर कडक कारवाईचे आदेश राज्यमंत्र्‍यांनी दिले आहेत.