आजकाल स्मार्टफोनच्या लोकप्रियेततून सोशल मिडियाचे वारे सर्वत्र मोठ्याप्रमाणात पसरताना दिसत आहे. मुक्तपणे आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी प्रत्येक जण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम यासारख्या सोशल मिडियाचा वापर करताना दिसतो. या माध्यमाचा मोठ्या प्रमाणात वापर होत असला तरी काही लोकांच्यामध्ये अद्यापही या माध्यमातून व्यक्त होताना भयाचा  विळखा असल्याचे दिसून येते. सोशल मिडियातून व्यक्त झाल्याने त्यावर उमटणाऱ्या प्रतिक्रिया आणि मानहानी सारख्या गुन्हे दाखल होऊन निर्माण होणाऱ्या समस्या तसेच स्वत:च्या माहितीची गोपनियता सार्वजनिक होणे, या भीतीपोटी काहीजण यामाध्यमातून व्यक्त होण्यास माघार घेत असतात. जे लोक या माध्यमांचा वापर करत आहेत त्यांच्यात देखील अशा समस्येसंदर्भात प्रश्न निर्माण होत असतात.
समाजात लोकप्रिय असणाऱ्या माध्यमासंदर्भातील ही भीती दुर करण्यासाठी बजाज अलायन्स जनरल विमा कंपनी एक नवी योजना आखत आहे. यामध्ये सोशल मिडियाच्या वापरामुळे अडचणीत सापडलेल्या व्यक्तीला संरक्षण मिळणार आहे.  इंटरनेटचा वाढता वापर आणि व्यवहार या गोष्टीला लक्षात घेऊन कंपनी समाज माध्यम वापरकर्त्यांना विम्याच्या माध्यमातून संरक्षण देणार असल्याची माहिती बजाज अलायन्स जनरल इन्सुरन्स कंपनीचे संस्थापक तपन सिंहल यांना ‘इकोनॉमिक्स टाईम्स’ला दिलेल्या मुलाखती वेळी दिली. सोशल मिडियातून व्यक्त झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीविरोधात न्यायालयामध्ये खटला दाखल झाल्यास त्याला ठोठावण्यात येणाऱ्या आर्थिक स्वरुपातील दंडाची रक्कम सायबर इन्शुरन्सच्या माध्यमातून कंपनी विमाधारकास देईल, असेही तपन सिंहल यांनी म्हटले आहे.

विमाधारकास वित्तीय आणि संवेदनशील माहितीच्या चोरीसंदर्भात संरक्षण दिले जाईल. असेही ते यावळी म्हणाले. सध्या वाढत्या इंटरनेटच्या जाळ्यात ऑनलाइन व्यवहार तसेच डेटासंदर्भात मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होताना दिसत आहे. त्यामुळे इंटरनेट वापरकर्त्यांना बजाज अलायन्सची ही विमा योजना दिलासा देणारी असेल. ही योजना प्रत्यक्षात उतरण्यासाठी नक्की किती दिवस लागतील याबाबत अद्याप कंपनीकडून कोणतेही स्पष्टीकरण करण्यात आलेले नाही.