Software Engineer Resigns Job With 14 LPA Within 9 Days: एका तरुण सॉफ्टवेअर इंजिनिअरने रेडिटवर त्याचा नोकरी शोधण्याचा अनुभव शेअर केला आहे. त्याच्या या अनुभवामुळे नोकरी मिळवण्यासाठी धडपड करणाऱ्यांमध्ये एक प्रकारची आशा निर्माण झाली आहे. रेडिटवरील पोस्टमध्ये त्याने सांगितले आहे की, तब्बल चार महिने तो बेरोजगार होता, पण त्यानंतर त्याला नोकरीच्या एकापाठोपाठ दोन ऑफर्स कशा मिळाल्या, तसेच पहिल्या नोकरीची ऑफर स्वीकारल्यानंतर ती कंपनी ९ दिवसांतच का सोडली, यावरही भाष्य केले आहे.

कधीकधी आयुष्य खूप वाईट असते

“मित्रांनो, कधीकधी आयुष्य खूप वाईट असते. मी ४ महिने बेरोजगार होतो, सर्वत्र अर्ज करत होतो, एकामागून एक नकार येत होते. शेवटी एका छोट्या स्टार्टअपमध्ये (सुमारे ८० लोक, ज्यात फक्त १० भारतीय कर्मचारी) नोकरी स्वीकारली. नव्या कंपनीत रुजू होऊन फक्त ९ दिवसच झाले होते. मला वाटले की, ‘आता परिस्थिती थोडी स्थिर झाली आहे’,” असे त्याने पोस्टच्या सुरुवातीला म्हटले आहे.

नव्या कंपनीने काय ऑफर दिली?

नव्या कंपनीत रुजू होऊन काही दिवसच झाले होते आणि त्याला नोकरीची आणखी एक संधी चालून आली. तो आधीच एका यूके-स्थित कंपनीशी नोकरीबाबत चर्चा करत होता. त्यांच्याकडून आता त्याला सॉफ्टवेअर इंजिनिअर पदाची ऑफर मिळाली होती. या नव्या कंपनीने त्याला १५ लाख रुपये वार्षिक पगाराची ऑफर दिली, जो त्याच्या सध्याच्या १४ लाख रुपये पगाराच्या तुलनेत खूपच कमी होता.

वर्क-लाईफ बॅलन्सला प्राधान्य

त्याने पोस्टमध्ये नमूद केले की, “नव्या कंपनीने पगारवाढ कमी दिली असली, तरी ती एक बहुराष्ट्रीय कंपनी आहे. ही स्थिर आणि चांगले उत्पादन असलेली कंपनी आहे. नोकरीचे ठिकाण बंगळुरू असून ऑफिसला फक्त दोन दिवस जावे लागते, त्यामुळे वर्क-लाईफ बॅलन्स साधणे सोपे जाईल.”

मित्रांनी काय सल्ला दिला?

नव्या कंपनीची ऑफर स्वीकारण्यापूर्वी त्याने एन्विडीया, अ‍ॅमेझॉन, झेटा आणि न्यूटॅनिक्स कंपनीत काम करणाऱ्या मित्र आणि वरिष्ठांशी चर्चा केली. त्या सर्वांनी या तरुणाला ही ऑफर स्वीकारण्याचा सल्ला दिला. तरुण म्हणाला की, “अक्षरशः प्रत्येकाने मला सांगितले की, ही ऑफर स्वीकार. पगारातील फरक कदाचित मोठा नसेल, परंतु करिअरचा मार्ग आणि जीवनाचा दर्जा चांगला असेल.”

राजीनाम्याचा निर्णय घेणे सोपे नव्हते

अवघ्या काही दिवसांपूर्वी रुजू झालेल्या कंपनीतून राजीनामा देणे सोपे नव्हते. नऊ दिवसांच्या आत राजीनामा देण्याबाबत त्याला खूप दडपण आले होते. पण त्याने राजीनामा देऊन शेवटी १५ लाख रुपये वार्षिक पगाराची नोकरी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेताना त्याने, किमान पुढील दोन वर्षे तरी नवी नोकरी शोधणार नसल्याचे ठरवले आहे.