आई-वडील आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी खूप कष्ट घेतात. स्वत: फाटके कपडे अन् फाटक्या चपला घालतील; मात्र मुलांना शाळेत नवीन वह्या-पुस्तकांपासून ते दप्तरापर्यंत अनेक गोष्टी घेऊन देतील. स्वत:ला कुठे दुखत, खुपत असले तरी त्याकडे दुर्लक्ष करून, मुलांसाठी जीवापाड मेहनत करतील. अनेकदा आपल्याला आईचे कष्ट, तिची माया दिसून येते; पण वडिलांची माया, त्यांचे कष्ट आपल्याला दिसत नाहीत. आयुष्यात कधी कठीण प्रसंग आला, तर आई रडून मोकळी होते. पण वडील आपले दु:ख लपवत कुटुंबासाठी एक ढाल म्हणून उभे राहतात, सगळ्यांना सावरून घेतात. सध्या सोशल मीडियावर वडील आणि मुलांचा एक भावूक करणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे; जो पाहून तुमचेही डोळे नकळतपणे भरून येतील.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक दिव्यांग वडील आपल्या मुलांना स्वत:च्या व्हीलचेअरवर बसवून शाळेत सोडत आहेत. वडिलांनी त्यांच्या ट्रायसिकलवर मागच्या सीटवर मुलीला आणि पुढच्या सीटवर आपल्या मांडीवर मुलाला बसवले आहे. दिव्यांग वडिलांनी खास मुलीला शाळेत सोडण्यासाठी आपल्या सायकलच्या मागे एक सीट तयार करून घेतली आहे. अशा प्रकारे ते ट्रॅफिकने भरलेल्या रस्त्यातून स्वत:च्या हाताने ट्रायसिकल चालवत मुलांना शाळेत सोडत आहेत. दिव्यांग असूनही खचून न जाता, हे वडील आपल्या मुलांनी चांगले शिकावे यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून कोणीही भावूक झाल्याशिवाय राहणार नाही.

PHOTO : भारतीय रेल्वेला गूगल ट्रान्सलेशन वापरणे पडले भारी! ट्रेनचे नाव झाले ‘मर्डर एक्स्प्रेस’; प्रवाशांचा संताप

दरम्यान, हा व्हिडीओ एक्सवर @dc_sanjay_jas नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे; ज्यावर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले, “वडिलांचे प्रेम दिसत नाही; पण ते आहे. त्यांच्या मेहनतीला काय म्हणावे.” तर दुसऱ्याने लिहिले, “जगातील सर्वांत शक्तिशाली माणसाला सलाम आणि आपल्या मुलांसाठी आभाळाएवढे प्रेम करणाऱ्या वडिलांना प्रणाम.” त्याशिवाय इतर अनेक युजर्सनीही यावर कमेंट करून आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.