सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर अनेक कॉर्पोरेट कर्मचारी त्यांच्या कामाच्या ठिकाणचे चांगले वाईट अनुभव मोठ्या प्रमाणात शेअर करत असतात. नुकताच एका स्टार्टअप कंपनीच्या व्यवस्थापकाने एका पोस्टद्वारे त्याचा अनुभव शेअर केला आहे. त्यामध्ये त्याने कंपनीत त्याला एका कनिष्ठ कर्मचाऱ्याचा कसा त्रास होत आहे, यावर भाष्य केले आहे.

सहा वर्षांहून अधिक अनुभव असल्याचे सांगणाऱ्या या व्यवस्थापकाने पोस्टच्या सुरुवातीला लिहिले आहे की, “संस्थापकांसारखे वागा/ही तुमची कंपनी आहे असे समजून काम करा.” या नेहमीच्या उत्साही भाषणानंतर, एक नवीन पदोन्नती मिळालेला टीम लीड माझ्याकडे आला आणि मला कुठे बसायचे, काय करायचे अशा गोष्टी सांगू लागला.

संचालकांशी माझे जवळचे संबंध

यानंतर गोंधळलेल्या अवस्थेत, व्यवस्थापकाने या टीम लीडला विचारले की, कमी अनुभव असलेल्या व्यक्तीला असे का वाटले की तो एखाद्या अनुभवी व्यक्तीला काय करायचे आणि काय नाही, हे सांगू शकतो. पोस्टनुसार, यावर टीम लीडने उत्तर दिले की, “मी सात महिन्यांपासून कंपनीत आहे, कंपनीच्या संचालकांशी माझे जवळचे संबंध आहेत आणि मला तुम्हाला मार्गदर्शन करण्यास सांगितले आहे.”

…त्यामुळे मला खूप अस्वस्थ वाटत आहे

या व्यवस्थापकाने पोस्टमध्ये पुढे दावा केला आहे की, परिस्थिती आणखी बिकट करणारी गोष्ट म्हणजे त्याची वृत्ती. “अडचण ही आहे की, तो खूप उद्धट आणि खालच्या दर्जाचे बोलतो, खरेतर तो मदत करतच नाही. त्यामुळे मला खूपच अस्वस्थ वाटत आहे”, असेही पोस्टमध्ये म्हटले आहे.

इथे वेगळ्या पद्धतीने काम चालते

पोस्टमध्ये व्यवस्थापकाने असाही आरोप केला की, मुलाखतीवेळी ज्या जबाबदाऱ्या देण्याचा शब्द दिला होता, त्या सोडून त्याला इतर कामे सांगितली जात आहेत. “मला व्यवस्थापनासाठी नियुक्त करण्यात आले होते, परंतु आता ते मला कंपनीतील कामाची प्रक्रिया समजून घेण्यासाठी ग्राहकांचे कॉल हाताळायला सांगत आहेत.”

याबाबत व्यवस्थापकाने एचआरला जाब विचारला तेव्हा, त्याला सांगण्यात आले की, “ही एक वाढती स्टार्टअप कंपनी आहे. त्यामुळे इथे वेगळ्या पद्धतीने काम चालते.”

तू मार्गदर्शन करण्याची गरज नाही

ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर रेडिटवरील युजर्स यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत आहेत. एक युजर म्हणाला, “कंपनीच्या संचालकाशी बोला आणि त्या मुलाला असे सांगून प्रोत्साहित करा की, मी माझी कामे स्वतःहून करू शकतो, तुला मार्गदर्शन करण्याची गरज नाही. मला काही हवे असेल तर मी विचारेन. जेव्हा जेव्हा तुम्हाला त्याची काही मदत हवी असेल, ती ईमेलच्या माध्यमातून मागा.”