हॉलीवूडचे प्रतिभावंत दिग्दर्शक स्टीव्हन स्पिलबर्ग यांनी त्यांच्या खासगी विमानासाठी मागील दोन महिन्यांमध्ये खर्च केलेल्या इंधनासंदर्भातील आकडेवारी समोर आली आहे. दोन महिन्यांमध्ये स्पिलबर्ग यांनी दोन महिन्यामध्ये विमानाच्या इंधनावर एक लाख १६ हजार अमेरिकी डॉलर्स खर्च केले आहेत. भारतीय चलनानुसार ही रक्कम ९२ लाख रुपये इतकी होती. या खर्चासंदर्भातील माहिती फॉक्स न्यूजने दिली आहे.

फॉक्स न्यूजने ही बातमी विमान उड्डाणांसंदर्भातील माहिती गोळा करणाऱ्या एडीएस-बी एक्सचेंजच्या आकडेवारीच्या आधारे देण्यात आली आहे. स्पिलबर्ग हे गल्फस्ट्रमी जी ६५० हे विमान वापरतात. २३ जूनपासून या विमानाने १६ वेगवगेळ्या ठिकाणी उड्डाणं केली आहेत. या विमानाने २८ हजार किमीचा प्रवास केल्याचं या आकडेवारीमधून समोर आलं आहे. विशेष म्हणजे समोर आलेल्या या आकडेवारीमध्ये स्पिलबर्ग यांच्या तीन इतर दौऱ्यांबद्दलच्या माहितीचा समावेश करण्यात आलेला नाही. सेलिब्रिटी जेट्सच्या माध्यमातून गोळा केली गेलेल्या माहितीचा यात समावेश करण्यात आलेला नाही.

स्पिलबर्ग यांनी इंधनावर केलेल्या खर्चाची एवढी चर्चा होण्यामागील कारण म्हणजे ते हॉलिवूडमधील मोजक्या पर्यावरणवादी सेलिब्रिटींपैकी एक आहेत. २०१८ च्या मुलाखतीमध्ये स्पिलबर्ग यांनी जागतिक तापमानवाढीची समस्या पाहून आपल्याला घाबरायला होतं असं म्हटलेलं. तसेच आपल्या कृतीचा पर्यावरणावर काय परिणाम होईल याचा विचार न करता जगणाऱ्यांवर स्पिलबर्ग यांनी टीकाही केली होती.

स्पिलबर्ग यांनी त्यांच्या रेडी प्लेअर वन नावाच्या चित्रपटाच्या वेळी दिलेल्या मुलाखतीमध्ये, “जागतिक तापमान वाढ हे वैज्ञानिक सत्य आहे. ही काही राजकीय गोष्ट नाही. हे खरोखर घडत असून त्याचे परिणाम दिसत आहेत,” असंही म्हटलं होतं. आपल्यापैकी प्रत्येकजण या तापमान वाढीसाठी जबाबदार आहे असंही ते म्हणाले होते. या उड्डाणाममधून १७९ टन कार्बनडाय ऑक्साइड वातावरणामध्ये उत्सर्जित झाल्याचा दावाही बातमीमध्ये करण्यात आला आहे.