उत्तर प्रदेशच्या सोनभद्र जिल्ह्यातील पोलिसांनी ट्रकवर दगडफेक केल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओनंतर आता चार पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. रॉबर्ट्सगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या लोधी भागातील खाण विभागातून अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रक थांबविण्याचा प्रयत्न करत असताना सदर घटना घडल्याचे सांगितले जात आहे. मात्र सदर घटना भ्रष्टाचाराची असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

इन्स्टाग्रामवर लोग क्या कहेंगे या हँडलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओखाली अनेकांनी पोलिसांविरोधात कमेंट केली आहे. तर काही जणांनी घटनेची सत्यता सांगितली आहे. हे पोलीस नसून दरोडेखोर आहेत, यांना पैसे मिळाले नाहीत, म्हणून दगड फेकत आहेत, अशी कमेंट एका युजरने केली आहे.

सोशल मीडियावर काहीही चर्चा असली तरी पोलिसांनी मात्र वेगळीच परिस्थिती सांगितली. सोनभद्रचे पोलीस उपअधीक्षक त्रिभुवन नाथ त्रिपाठी म्हणाले, रॉबर्ट्सगंज पोलीस ठाण्याचे प्रमुख गोपालजी गुप्ता यांना पोलीस लाइन्समध्ये पाठविण्यात आले आहे. तर इतर तीन शिपाई निलंबित करण्यात आले आहेत. ट्रक थांबविण्यासाठी त्यांनी बेकायदेशीर मार्गाचा वापर केल्याचा ठपका ठेवला आहे.

त्रिभुवन नाथ त्रिपाठी पुढे म्हणाले की, या प्रकरणाचा पुढील तपास आम्ही करत आहोत. यातून जे काही निष्पन्न होईल, त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल. पोलिसांनी जी दगडफेक केली ती रॉबर्ट्सगंज परिसरातील लोधी टोल प्लाझाजवळ झाली. पोलिसांनी दगडफेकीत ट्रकच्या केबिनचे नुकसान झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.

नेमके प्रकरण काय?

पोलिसांनी या दगडफेकीचे कारणही सांगितले आहे. १२ सप्टेंबर रोजी रात्री ११.४० वाजता पोलीस लोधी टोल प्लाझा येथे अवैध खनिज वाहतुकीची तपासणी करत होते. यावेळी काही ट्रक तपासणीसाठी न थांबता पळ काढायचा प्रयत्न करत होते. यावेळी त्यांना थांबविताना पोलिसांनी अनुचित प्रकाराचा अवलंब केला.

याबद्दल रॉबर्ट्सगंज पोलीस ठाण्यात खाण विभागाचे निरीक्षक योगेश शुक्ला यांनी गुन्हा दाखल केला आहे. सदर ट्रक यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी माझ्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न केला, असे सांगितले. त्यामुळे माझ्याबरोबर उपस्थित असलेल्या पोलिसांनी स्वतःचा जीव वाचविण्यासाठी दगडफेक केली. जी व्हिडीओ क्लीप व्हायरल झाली आहे, त्यातही पोलीस थांबवा त्यांना, थांबवा त्यांना, असे ओरडताना दिसत आहे.

शुक्ला यांच्या तक्रारीनंतर ट्रक चालकांविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे.