पतीच्या दिर्घ आयुष्यासाठी आपल्याकडे पत्नी उपवास करून वडाची पूजा करतात. तसेच भारताच्या अनेक भागांत पतीच्या दिर्घ आयुष्यासाठी ‘करवा चौथ’ साजरा केला जातो. या दिवशी दिवसभर पत्नी आपल्या पतीसाठी निर्जळी उपवास करतात. चंद्रदर्शन झाल्यानंतर चंद्र आणि मग पतीची पूजा करून पत्नी आपला निर्जळी उपवास सोडते. यमाने सत्यवानाचे प्राण घेतल्यानंतर सावित्रीने यमाकडून त्याचे प्राण परत आणले होते अशीच काहीशी मिळती जुळती कथा ‘करवा चौथ’ची देखील आहे.
सात भावांची आवडती आणि एकूलती एक बहिण वीरावती ही आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी निर्जळी उपवास ठेवते. चंद्राचे दर्शन होत नसल्याने तिला आपला उपवास सोडता येत नाही. त्यामुळे अन्न पाण्यावाचून तिष्ठत असलेल्या आपल्या बहिणीला पाहून या सातही भावांच्या मनाला दु :ख होते. जोपर्यंत चंद्र दर्शन होणार नाही तोपर्यंत वीरावती अन्नग्रहण करणार नाही हे त्यांना चांगलेच ठावूक असते त्यामुळे शक्कल लढवून ते वीरावतीला उपवास सोडायला भाग पाडतात. घराशेजारी असणा-या झाडावर गोलाकार आसरा ठेवून तो चंद्र आहे असे सांगत तिचे सातही भाऊ तिला उपवास सोडायला भाग पाडतात. भावांच्या सांगण्यावर विश्वास ठेवत वीरवती देखील आपला उपवास सोडते. पण ख-या चंद्राचे दर्शन न घेता व्रताचा नियम मोडल्यामुळे तिचा पती मरण पावतो. भावांकडून फसवले गेल्यामुळे आणि पतीचा मृत्यू झाल्यामुळे दु :खी झालेली वीरावती अश्रू ढाळत बसते. अशावेळी देवी तिथे प्रकट होते. रडणा-या वीरावतीला दु:खाचे कारण विचारते. तेव्हा वीरावती सगळी हकिकत सांगते. वीरावतीआणि तिच्या भावाकडून अनावधानाने झालेली चूक लक्षात घेता देवी तिला पुन्हा उपवास करायला सांगते आणि वीरावतीच्या पतीचे प्राण परत देते. करवा चौथच्या अनेक कथांपैकी ही दंतकथा एक आहे.
पण काही जण आणखी वेगळ्या पद्धतीने करवा चौथची कथा सांगतात. पतीचा मृत्यू झाल्याने दु :खी झालेली वीरावती शंकर आणि पार्वतीकडे जाते. भावांच्या हातून झालेल्या चूकीची सगळी हकिकत ती पार्वतीला सांगते. पार्वतीच्या पवित्र रक्तामुळे आणि वीरावतीच्या कडक व्रतामुळे तिच्या नव-याचे प्राण परत येतात अशीही एक कथा सांगितली जाते.