scorecardresearch

गावस्करांनी ‘कोहिनूर’संदर्भात असा काही प्रश्न विचारला की लोक विचारु लागली, “गावस्करांना भारतरत्न कधी देताय?”; पाहा Video

गावस्करांचा प्रश्न ऐकून शेजारी बसलेला ब्रिटीश कॉमेटेंटर क्लीन बोल्ड झाल्याचं दिसून आलं.

Gavaskar on Kohinoor
हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरतोय (फाइल फोटो)

भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावस्कर हे त्यांच्या क्रिकेट कारकीर्दीइतकेच त्यांच्या कॉमेन्ट्री बॉक्समधील कारकिर्दीसाठी प्रसिद्ध आहेत. सामना सुरु असताना सामन्यातील बारकाव्यांबरोबरच अनेकदा सुनिल गावस्कर सोबतच्या सहकाऱ्याची फिरकी घेतानाही दिसतात. अनेकदा त्यांची ही शैली चाहत्यांना फार आवडते. सामन्याशीसंदर्भात रंजक माहिती आणि संधी मिळेल तेव्हा लगावलेले शाब्दिक षटकार चाहते अगदी कानसेन होऊन ऐकतात. काल पार पडलेल्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स सामन्यादरम्यानही असाच प्रकार घडला.

मुंबईमधील वानखेडे मैदानामध्ये पार पडलेल्या या सामन्यात दोन षटकांमधील ब्रेकदरम्यान मुंबईतील मरिन ड्राइव्ह आणि क्विन्स नेकलेसचा एरिअल व्ह्यू दाखवण्यात आला. हा व्ह्यू दाखवला जात असतानाच गावस्कर यांनी या भागाला क्विन्स नेकलेस असं म्हणतात अशी माहिती सोबत कॉमेन्ट्री करणाऱ्या अ‍ॅलन विलकीन्सला दिली. मरीन ड्राइव्हवरील रोषणाई राणीच्या गळातील हाराप्रमाणे दिसते म्हणून त्याला हे नाव ठेवण्यात आल्याचं सांगताना पुढे लगेच गावस्कर यांनी ब्रिटीश समालोचकाला कोहिनूर हिऱ्याची आठवण करुन दिली. “आम्ही अजूनही कोहिनूर हिऱ्याची वाट पाहत आहोत,” असं म्हणत गावस्कर यांनी ब्रिटीशांकडे असलेल्या कोहिनूर हिऱ्याबद्दल वक्तव्य केलं. हे वक्तव्य ऐकून दोघेही हसू लागले.

बरं गावस्कर इतक्यावरच तांबले नाही तर ते अ‍ॅलनला पुढे विचारु लागले. तुझी काही विशेष ओळख असेल ब्रिटनमध्ये तर ब्रिटीश सरकारला तो मौल्यवान हिरा परत करायला सांग, अशी मजेदार मागणीही गावस्कर यांनी बोलता बोलता केली.

गावस्कर यांची ही मजेदार मागणी नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरली असून अनेकांनी हा व्हिडीओ शेअर करत त्यावर प्रतिक्रिया दिल्यात. पाहुयात काही निवडक प्रतिक्रिया
१) गावस्करांना यासाठी भारतरत्न द्या

२) गावस्करांनी घेतली फिरकी

३) नाद खुळा

४) भारीच

५) एक भारतीय कोहिनूर मागताना

गावस्कर यांची ही मागणी सध्या नेटकऱ्यांमध्ये चांगलीच चर्चा असून अनेकांनी कोणीतरी हिंमत दाखवून हे बोलू दाखवल्याबद्दल समाधान व्यक्त करणारी मजेशीर वक्तव्य केली आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sunil gavaskar asks british commentator about kohinoor during ipl match twitter reacts scsg

ताज्या बातम्या