सेल्फी काढण्याचे वेड अनेकांना महागात पडले आहे. आता सेल्फी काढण्याच्या नादात कित्येकांनी जीव गमावले तर कित्येकाने हात पाय मोडून घेतले अशा बातम्या रोजच वाचण्यात येतात. पण सेल्फी काढणे सिरिअन बंडखोरांच्या देखील जीवावर बेतले आहे. सेल्फी काढण्याच्या नादात एका बंडखोर सैनिकाने चुकून दुसरे बटन दाबले. हे बटन बॉम्बशी कनेक्ट होते त्यामुळे बटन दाबताच स्फोट झाला. याचा व्हिडिओ समोर आला आहे.
काही सिरिअन बंडखोर एकत्र बसून आनंद साजरा करत होते. त्यांच्या समोर बंदूका आणि बॉम्ब देखील होते. एका खोलीत बसून ते विजयाची पार्टी करत असल्याचे समजते. मोबाईलमध्ये गाणी लावून यातले काही बंडखोर गातही होते. आपले हे क्षण कॅमेरात कैद करण्याचा मोह त्यातल्या एकाला झाला. त्याने सेल्फी काढण्याचा आग्रही इतरांना केला. सेल्फी काढण्यासाठी त्याने कॅमेरा पुढे धरला पण कॅमेराच्या बटनावर क्लिक करण्याऐवजी त्याने चुकीच्या बटनावर क्लिक केले त्यामुळे स्फोट झाला. स्फोटानंतरही व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू असल्याने हा संपूर्ण प्रकार व्हिडिओत कैद झाला. पण या बॉम्ब स्फोटात कोणत्याही प्रकारची जिवतहानी झाली की नाही हे समजले नाही. स्फोट झाल्यानंतरही काहींनी अल्लाहु अकबरचे नारे देत उठण्याचा प्रयत्न केला.