Teacher uses AI to show kids their future career: आपल्या घरात किंवा बाहेर कुठेही एखादा लहान मुलगा किंवा मुलगी दिसली की त्यांना आपण आवर्जून विचारतो, मग मोठं झाल्यावर काय बनायचं आहे? तेव्हा खरं तर मुलांच्या डोक्यात काय शिजत असतं याचा थांगपत्ता लागत नाही, पण साधारणपणे ते इंजिनियर, डॉक्टर, क्रिकेटर अशी उत्तरं देतात. मुलं मोठी होऊन काय करणार यात सगळ्यात मोठा वाटा असतो तो शाळांचा आणि त्यांच्या शिक्षकांचा. त्यांच्या प्रोत्साहनामुळे मुलांचं भविष्य घडतं. हे एआयचं युग आहे आणि मुलांना त्याचं आकर्षण तर आहेच. या एआयचा वापर शाळेतल्या शिक्षकांनी मुलांच्या एका ॲक्टिव्हिटीसाठी केला आहे.
मुलांच्या भविष्याचं एआय व्हर्जन
नोएडातील एका शाळेतील शिक्षकांनी मुलांसाठी हा उपक्रम घेतला होता. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इंडियन्स या अकाउंटवरून हा व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये शाळेत एका वर्गात व्हर्च्युअल स्क्रीनसमोर उभं राहत मुलांना मोठं झाल्यावर काय बनायचं आहे हे सांगताना ते दिसत आहेत. यामध्ये एक मुलगा समोर येऊन म्हणतो की, मला डॉक्टर बनायचं आहे आणि पुढच्या क्षणाला त्या मुलाच्या चेहरेपट्टीप्रमाणे एआय त्याचं तरुण वयातलं डॉक्टर व्हर्जन तयार करून दाखवताना दिसत आहे. वर्गातील सगळीच मुले अशाप्रकारे एकामागोमाग एक आपल्या इच्छा व्यक्त करताना दिसत आहेत.
महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण ॲक्टिव्हिटीमध्ये मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद मात्र पाहण्यासारखा आहे. ज्या क्षणी एआय त्यांचं भविष्यातलं व्हर्जन तयार करून फोटो दाखवत आहे, त्याक्षणी त्या मुलांच्या चेहऱ्यावरचे हावभाव खूप काही सांगून जातात. त्यांचे शिक्षिकाही या पूर्ण ॲक्टिव्हिटीचा व्हिडीओ शूट करताना दिसत आहेत.
शाळेत अशाप्रकारच्या ॲक्टिव्हिटी केल्याने मुलांना त्यांच्या भविष्याचा विचार सकारात्मक मार्गाने करण्यासाठी प्रोत्साहन मिळते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या शाळेत केलेल्या या उपक्रमाचे कौतुक सोशल मीडियावर होत आहे. शिवाय मुलांचा उत्साह पाहून हा खरंच मुलांसाठी स्तुत्य उपक्रम असल्याचे म्हटले जात आहे.