तेलंगणातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ती म्हणजे जवळपास १०० हून अधिक लोकांनी एकत्र येत एका महिलेचं अपहरण केल्याची घटना घडली आहे. हे सर्व लोक जबरदस्तीने महिलेच्या घरात घुसले आणि कुटुंबातील सदस्यांना बेदम मारहाणही केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. तर आरोपींनी महिलेच्या घराशेजारी उभ्या असलेल्या गाड्यांच्या काचा फोडल्याचंही व्हिडीओमध्ये दिसतं आहे. या घटनेचा व्हिडीओ एएनआयने ट्विट केला आहे.
हेही वाचा- ९ दिवसांत पोलिसांना २ हजारांवर फोन करत दिल्या शिव्या; अटक करताच म्हणाला…
मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणातील रंगा रेड्डी जिल्ह्यातील आदिबाटला येथे शनिवारी ही घटना घडली. येथील एका २४ वर्षीय महिलेचे तिच्या घरातून अपहरण करण्यात आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे या महिलेचे अपहरण करण्यासाठी शंभरहून अधिक लोक आले होते. यावेळी त्यांनी महिलेच्या घराची मोडतोड करत कुटुंबातील सदस्यांना मारहाण देखील केली आहे.
एजेंसीच्या माहितीनुसार, या महिलेच्या आई-वडिलांनी सांगितलं की, सुमारे १०० लोकांनी आमच्या घरावर हल्ला करत त्याच्या मुलीचे अपहरण केले. मुलीचे नाव वैशाली असल्याचंही त्यांनी सांगितलं. तर आरोपींनी घरातील वस्तूंची तोडफोड करत वाहनांच्या काचा फोडल्याचंही मुलीच्या पालकांनी सांगितलं आहे.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडीओमध्ये शंभरहून अधिक लोकांच्या घोळक्याने महिलेच्या कुटुंबातील सदस्यांना बाहेर ओढत लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केल्याचं दिसतं आहे. दरम्यान, तेलंगणा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखलकरत या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं सांगितलं आहे. शिवाय रंगा रेड्डी येथील महिलेचं अपहरण झालं असल्याच्या घटनेला पोलिसांनी दुजोरा दिला असून या प्रकरणाचा तपास सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं.