आज भारतातील अनेक भागातील विवाहित महिला आपल्या पतीच्या दिर्घ आयुष्यासाठी करवा चौथचा व्रत करतात. कार्तिक महिन्याच्या चौथ्या दिवशी करवा चौथ साजरी केली जाते. पण यंदाच्या करवा चौथला विशेष महत्त्व आहे. १०० वर्षानंतर यंदा असा शुभ योगायोग जुळून आला आहे.  आज करवा चौथच्या दिवशी संकष्टी आहे पण त्याचबरोबर श्रीकृष्णाचे रोहिणी नक्षत्र देखील आहे. आज चंद्र रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. गणपती आणि श्रीकृष्ण या दोघांचेही करवा चौथच्या पूजेत विशेष महत्त्व आहे. कारण या दिवशी चंद्राची पूजा करण्याबरोबर शंकर- पार्वती, कार्तिक, गणपती यांची देखील आरधना केली जाते. तर द्रौपदीला देखील कृष्णाने या व्रताची महती सांगितल्याची कथा आहे. त्यामुळे  यंदाच्या करवा चौथला हे शुभ योगायोग जुळून आले आहेत. शंभर वर्षांनंतर जुळून आलेल्या या योगामुळे आजच्या दिवशी करवा चौथचे व्रत करणा-या पतीव्रतेला १०० व्रत केल्याचे पुण्य लाभते अशी मान्यता आहे. त्यामुळे आजचा करवा चौथ हा खास आहे.

वाचा :  कथा ‘करवा चौथ’ची

पतीला दिर्घ आयुष्य लाभावे यासाठी आजच्या दिवशी पत्नी निर्जळी उपवास करतात. चंद्राचे दर्शन झाल्यानंतर पती आणि चंद्राची पूजा करून हा उपवास सोडला जातो. पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये मात्र पीक चांगले यावे यासाठी महिला करवा चौथचे व्रत करायच्या. रब्बीचा हंगाम सुरू व्हायचा, त्यामुळे मोठ्या मातीच्या घडामध्ये गहू पेरले जायचे. या मातीच्या घडालाच तिथे ‘करवा’ असे म्हटले जाते. करवा चौथच्या मान्यता आणि प्रथा प्रत्येक राज्यात या वेगवेगळ्या आहेत. काळानुसार हे व्रत करण्याच्या प्रथाही बदलत गेल्या, पण वर्षानुवर्ष चालत आलेली चंद्रदर्शन करून उपवास सोडायची प्रथा आजही कायम आहे. भारताच्या वेगवेगळ्या भागात चंद्रोदयाच्या वेळा या वेगळ्या असल्या तरी यंदाचा योग हा १०० वर्षांनी आल्यामुळे सगळ्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे.

वाचा : हे आहेत ‘करवा चौथ’चे चंद्रोदय मुहूर्त..