सैनिकी गणवेश, डोळ्यात अभिमान, चेह-यावर मातृभूमीच्या सेवेसाठी लढण्याचा निडर भाव.. सीमेवर देशाचे संरक्षण करणा-या तिन्ही दलांच्या सैन्याला पाहिले की त्यांच्या शिस्तीचे, मातृभूमीसाठी लढणा-या त्यांच्या दृढनिश्चयाचे प्रचंड अप्रुप अन् कौतुकही आपल्याला वाटते. तिरंग्याला मानवंदना देताना नौदल, हवाईदल आणि भूदलाच्या सैनिकांना पाहिल्यावर छाती अभिमानाने फुलून येते. पण तुम्ही या तिन्ही सैनिकांकडे बारकाईने पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की या तिन्ही दलातील सैनिकांची ‘सॅल्युट’ करण्याची पद्धत ही एकमेकांपेक्षा वेगळी आहे.
भूदल – भूदलातील सैनिक ‘सॅल्युट’ करताना हात कोप-यातून दुमडतात याचवेळी तुम्ही नीट पाहिले तर त्यांची बोटे ही एकमेकांना जोडली असतात, त्यातले मधले बोट हे भुवईला स्पर्श करते. ज्या हातात शस्त्र असते त्या हाताने हा ‘सॅल्युट’ केला जातो, कोणतीही वाईट भावना मनात न आणता आपण ‘सॅल्युट’ करत असल्याचे यातून सुचित होते. तसेच ज्या हाताने शस्त्रे चालवले जाते त्याच हाताने ‘सॅल्युट’ करुन आपल्या हातात कोणतेही छुपे शस्त्र नसल्याचेही यातून नमूद होते.
नौदल – नौदलाच्या ‘सॅल्युट’ मध्ये किंचितसा फरक असतो. ‘सॅल्युट’ करताना तळवा हा ९० अंशात खाली वाकलेला असतो. पूर्वी जहाजांवर असेल्या सैनिकांचे तेल, ग्रिसमुळे हात खराब व्हायचे त्यामुळे ते लपवण्यासाठी असा प्रकारे ‘सॅल्युट’ केला जातो.
हवाई दल – हवाई दलाचा ‘सॅल्युट’ हा नौदल आणि भूदलाच्या अगदी मधोमध असल्याचे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. पूर्वी हवाई दलाचा ‘सॅल्युट’ हा भूदलासारखाच होता पण २००६ मध्ये यात बदल करण्यात आले. त्यामुळे ‘सॅल्युट’ करताना तळवा हा ४५ अंशात वाकलेला असतो.