लग्नसराईचा हंगाम असल्याने सोशल मीडियावर सोहळ्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर होत आहेत. भारतात लग्नसमारंभ मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरे केले जातात. नातेवाईकांचे रुसवेफुगवे सोडले तर नाचगाणं याचा आनंद लुटताना दिसतात. मात्र ऐनवेळी काहीतरी गडबड झाली तर सगळ्यांच्या आनंदावर पाणी फेरलं जातं. असे अनेक व्हिडिओ आणि तिथले प्रसंग नेटिझन्सचं लक्ष वेधून घेत आहेत. काही व्हिडिओ इतके मजेशीर असतात की हसू आवरत नाही. असाच एका वरातीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वराती मागून घोडे अशी म्हण आहे, पण इथे घोडाच नवरदेवाला घेऊन पळून गेल्याने सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
एका लग्नातील वरातीत नवरदेव मोठ्या ऐटीत घोड्यावर बसला आहे. यावेळी घोड्याचा सांभाळ करणारे घोडा नाचवण्यासाठी पुढे सरसावतात. टेबल बाजूला करून त्याला नाचण्याच्या सूचना देतात. सूचनांचं पालन करण्यासाठी घोडाही तयार होतं. नेमकं त्यावेळी बाजूला फटका फुटतो आणि घोडा घाबरून नवरदेवासोबत पळून जातो. घोडा थांबवण्याचा नवरदेव प्रयत्न करतो. मात्र त्याला काही घोडा आवरत नाही. तसेच घोडा सांभाळणारे दोघंही त्याच्यामागे धावताना व्हिडिओत दिसतात. उपस्थितांनाही काही कळायच्या आत घोडा धूम ठोकतो. त्यामुळे हातवारे आणि आरडाओरड करण्याखेरीज काही करता येत नाही.
हा व्हायरल व्हिडिओ पाहून अनेक जण मजेशीर कमेंट्स करत आहेत. तसेच शेअर करत आपल्या मित्रांना टॅग करून त्यांच्या लग्नाचा संदर्भ देत आहेत. एका युजर्सने लिहीलं आहे की, घोड्याने नवरदेवाला नक्कीच पाडलं असेल. तर दुसऱ्याने लिहीलं आहे की, घोड्याने नवरदेवाला आणखी एक संधी द्यायला हवी.