मंदिरात दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक भक्तिभावाने येतात. या भाविकांसाठी पिण्याचं पाणी, दर्शन लाईव्ह पाहण्यासाठी एलईडी टीव्ही, स्वछतागृह; तर दर्शन घ्यायला येणाऱ्या वृद्ध व्यक्तींसाठी व्हीलचेअर व अनेक पायऱ्या असणाऱ्या मंदिरात पोहचण्यासाठी विजेवर चालणारी उपकरणे यांचीसुद्धा सोय करण्यात येते. तर आज एका व्हायरल व्हिडीओत कोणत्याही उपकरणांची मदत न घेता पोलिस स्वतः एका वृद्ध महिलेला उचलून मंदिरात दर्शनासाठी घेऊन जाताना दिसले आहेत.

व्हायरल व्हिडीओ ओडिशातील पुरी येथील भगवान जगन्नाथ यांच्या मंदिरातील आहे. मंदिरात दर्शन घेण्यासाठी एक वृद्ध महिला तिथे आलेली असते. वयोवृद्ध महिलेला मंदिराच्या परिसरात चालता येत नव्हते. त्यामुळे एक पोलिस अधिकारी त्यांच्या सेवेत हजर झाले. वृद्ध महिलेचं दर्शन लवकर आणि सोयीस्कर व्हावं यासाठी पोलिस अधिकारी मदत करतात आणि वृद्ध महिलेला उचलून घेऊन दर्शन करण्यासाठी घेऊन जातात. पोलिस अधिकारी कशाप्रकारे वृद्ध महिलेची मदत करतात तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघा…

हेही वाचा… “पोरी येरा केलास मला…” भात लावणी करताना आजीनं गायलं भन्नाट गाणं, नेटकरी म्हणतात “वय केवळ आकडा”

पोस्ट नक्की बघा :

व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, पोलिस अधिकारी अनवाणी पायाने, तर गणवेश घालून मंदिरात प्रवेश करतात. तसेच वृद्ध महिलेला उचलून घेतात आणि भगवान जगन्नाथ यांच्या दर्शनासाठी घेऊन जातात. हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ओडिशातील पुरी येथील भगवान जगन्नाथ मंदिरात कार्तिक महिन्यात भाविकांची प्रचंड गर्दी असते. यादरम्यान श्री जगन्नाथ मंदिरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच वृद्ध भाविकांना आरामात दर्शन मिळावे यासाठी विशेष प्रयत्न व काळजी घेण्यात येत आहे.

तसेच मंदिराच्या परिसरात उपस्थित पुरी पोलिसांनी हा क्षण मोबाइलमध्ये शूट करून घेतला. सोशल मीडियावर ही पोस्ट पुरी पोलिस यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) @sspuri1 या अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. तसेच हा हृदयस्पर्शी व्हिडीओ पाहून अनेक जण पोलिस अधिकाऱ्याचे विविध शब्दात कौतुक करताना दिसले आहेत. पोलिस अधिकाऱ्याला सलाम करताना आणि गुड जॉब पुरी पोलिस, अशा अनेक कमेंट व्हिडीओखाली तुम्हाला पाहायला मिळतील.