दिल्लीतील प्राणी संग्रहालयात सिंह बंदिस्त असलेल्या एका मोठ्या जाळीत, एका तरुणाने थेट उडी घेतल्याने एकच गोंधळ उडाला होता. मात्र, यानंतर पुढे जे काही घडले ते पाहिल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. विशेष म्हणजे जवळपास पाच मिनीटांपेक्षा जास्त काळ हा तरूण मोकळ्या असेलल्या सिंहाच्या तावडीत होता. नुसती सिंह गर्जना ऐकल्यानंतरच भल्या भल्यांची भंबेरी उडत असते, मात्र प्रत्यक्षात सिंहाच्या जबड्यासमोर येऊन देखील या तरूणास साधे खरचटले देखील नाही व तो सुखरूप पिंजऱ्याबाहेर आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रेहान खान असे या तरूणाचे नाव आहे व मानसिक रोगी असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान ही अंगावर शहारे आणणारी घटना पाहणाऱ्यांना मात्र चांगलीच धडकी भरली होती. विशेष म्हणजे या तरूणास सिंह बंदिस्त असलेल्या पिंजऱ्याच्या जाळीवर चढताना, अनेकांनी थांबवण्याचा देखील प्रयत्न केला होता. मात्र त्याने कुणालाही न जुमानता थेट सिंहाच्या पिंजऱ्यात उडी घेतली व थेट सिंहासमोर आला. यानंतर जे घडले ते खरोखर धक्कादायक होते, या तरुणाला समोर पाहून सिंह याचा फडशा पाडल्याशिवाय राहणार नाही, अशी बाहेर असेलल्या नागिराकांची पक्की खात्री देखील झाली होती, मात्र सुदैवाने तसे काही झाले नाही.

सिंह व तरूण एकमेकांसमोर काही क्षण बसले देखील होते. जवळपास पाच मिनीटांपेक्षा जास्त काळ हा तरूण सिंहाच्या तावडीतच होता. या दरम्यान सिंहाने आपला जबडा देखील त्याच्या जवळ नेल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. एवढेच नाहीतर तेथील एका झाडाखाली सिंह तरूणाच्या अंगावर देखील चढण्याचा प्रयत्न केला.

एवढे सगळे होऊनही सिंहाने या तरूणाला कुठेही इजा केली नाही, दरम्यान घटनेची माहिती मिळताच प्राणीसंग्रहालयातील सुरक्षा रक्षक सिंहाच्या पिंजऱ्यात शिरले व त्यांनी या तरूणास सिंहाच्या तावडीतून सुखरूप बाहेर काढले. हे पाहिल्यानंतर उपस्थित नागरिकांचा जीव भांड्यात पडला. यानंतर या तरूणास पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले तेव्हा तो मानसिक रोगी असल्याची देखील माहिती समोर आली. पोलीस त्याची विचारपूस करण्याचा प्रयत्न करत आहेत.

याप्रकरणी पोलीस अधीक्षकांनी माहिती दिली की, या तरूणाचे नाव रेहान खान (वय-२८) असुन, तो बिहारचा रहिवासी आहे. तो मानसिकदृष्ट्या अस्थिर दिसत आहे. त्याला कुठलीही दुखापत न होऊ देता सिंहाच्या तावडीतून बाहेर काढण्यात आले होते. दिल्लीतील सीलमपुर भागात अनेक दिवसांपासून तो राहत आहे. या तरूणाच वाचवण्यासाठी प्राणीसंग्रहालयातील सुरक्षा रक्षकांची चार पथकं सिंहाच्या पिंजऱ्यात शिरली होती.