रोड ट्रिप फक्त तरूण तरुणांनी करायची असं कुठे लिहिलय? आणि साठी ओलांडलेल्या व्यक्ती फक्त तिर्थयात्रेलाच जातात असाही नियम कुठे आहे पण तरीही आपल्या इथे हा समज आहेच. तरुण वयात रोड ट्रिप करायची, मित्र मैत्रींणींसोबत मज्जा करायची आणि वय सरलं की तिर्थयात्रेला जायचं, पण हाच समज मोडून काढलाय दिल्लीच्या तीन आजींनी, अनेकांच्या नाकावर टिच्चून या आजी रोड ट्रिपला निघाल्यात.
निरू गांधी, मोनिका चन्ना आणि प्रतिभा सबरवाल या तिघीही साठीतल्या. या तिघीही गाडी घेऊन ४ हजार किलोमीटरच्या प्रवासाला निघाल्यात. गुजरात ते राजस्थान त्यातूनही वाळवंटातून प्रवास करत करत १९ वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी आपल्या मुक्काम ठोकला आहे. हे फक्त २५ दिवसांत करण्याचा त्यांचा प्लान आहे. दुसरं या आजींच्या वयावर अजिबात जाऊ नका बरं का! त्या स्वत: गाडी चालवत ट्रिपला निघाल्यात. पंचवीस दिवसांच्या आपल्या या ट्रिपमध्ये त्यांनी अनेक ठिकाणांना भेटी दिल्या आहे. मज्जा करण्यासाठी वय नसतं. वय म्हणजे फक्त आकड्यांचा खेळ या आकड्यांकडे दुर्लक्ष करायचं असा या तिघींचाही फंडा. त्या ज्या ज्या ठिकाणी भेट देतात त्याची माहिती शेअर करायला विसरत नाहीत. याचा एक किस्साही त्यांनी शेअर केला होता.”आम्ही राजस्थानच्या वाळवंटातून प्रवास करण्याचे ठरवले होते, या प्रवासात गाडी वाळूत अडकून पडली होती काही केल्या गाडी पुढे निघेना, आमची तर पारच घाबरगुंडी उडाली होती पण नशीबांने त्यावेळी तिथले स्थानिक मदतीला धावून आले आणि त्यांनी मदत केली.” पण हा अनुभव खूप काही शिकवण्यासारखा होता हे मात्र तिघींनीही कबुल केले.
वाचा : या दोघांना जग फिरण्याचे पैसे मिळतात!
भारताच्या अनेक गावात आजही महिला चूल आणि मूल या दोनच गोष्टींपुरता मर्यादित आहे. स्त्रियांनी असे बाहेर फिरणे आणि स्वतंत्र्य अनुभवणे जणू गुन्हाच मानला जातो. पण ही सारी बंधनं मोडून या गावांतून फिरताना एक वेगळाच अनुभव वाट्याला आला असंही त्यांनी सांगितलं. या तिन्ही आजीबाईंनी जगण्याचा एक नवा दृष्टीकोन दिला आहे. जीवनाचा पुरेपुर आनंद घ्यायचा असेल तर वय बघू नका फक्त मनाचे ऐका आणि दरदिवशी वेगळं काहीतरी अनुभवा असा मंत्रच या आजींनी आजच्या पीढीला दिला आहे.