आपण बँकेत रोख रक्कम किंवा धनादेश डिपॉझिट करतो पण कधी राम नाम लिहिलेल्या वह्या डिपॉझिट केलेल्या ऐकल्यात का? मग तर या बँकबद्दल ऐकलच पाहिजे. आयोध्यामध्ये अशी एक बँक आहे ज्या बँकेत पैसे नाही तर ‘श्री सीता राम’ असे लिहिलेल्या वह्या डिपॉझिट केल्या जातात. अयोध्याच्या ”मणि राम की छौनी” या भागात ”आंतरराष्ट्रीय श्री सीता राम नाम” बँक आहे. या बँकेला पैसे किंवा व्याज घेण्यात काही रस नाही, पण तरीही भारतच नाही पण जगभरात या बँकेचे खातेधारक आहेत.
गेल्या वीस वर्षांपासून ही बँक इथे असल्याचे सांगण्यात येत आहे. या बँकेतून भक्तांना को-या वह्या दिल्या जातात. या को-या वह्यांवर भक्त ”श्री सीता राम” लिहितात. या वह्या पूर्ण भरल्या की त्या बँकेत आणून ग्राहक डिपॉझिट करतात. को-या वह्या घेऊन गेल्यानंतर महिन्याभरात किंवा वर्षभरात ग्राहक त्या परत करतात आणि दुस-या खेपेला नव्या वह्या घेऊन जातात. अमेरिका, नेपाळ, पोलंड, कॅनडा अशा अनेक ठिकाणी या बँकेच्या शाखा आहेत. फक्त हिंदीतच नाही तर उर्दू भाषेत देखील रामाचे नाव लिहिलेल्या अनेक वह्या येथे भक्त घेऊन येत असल्याचे एएनआयने म्हटले आहे. कर्मचारी, व्यवसायिक, रिक्षाचालक, गृहिणी असा अनेक जणांची या बँकेत खाती आहेत. देवाचे नामस्मरण करण्याची ही चांगली पद्धत आहे अशी प्रतिक्रिया निर्मोही आखाड्याचे महंत पुनित राम दास यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिली आहे.
आतापर्यंत या बँकेत कोटींच्या संख्येने राम नाम लिहिलेल्या वह्या जमा करण्यात आल्याचा दावा या बँकेने केला आहे. तसेच परदेशात या को-या वह्या पाठवण्याची तसेच तिथून कुरिअरने या वह्या परत आणण्याची सुविधाही देण्यात आली आहे.